Team India : आयर्लंड-इंग्लंड विरूद्धच्या टी 20i सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, श्रेयस अय्यर कर्णधार, वैभव सूर्यवंशीची एन्ट्री

Shreyas Iyer and Vaibhav Sooryavanshi Team India : भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. श्रेयस अय्यर याची भारतीय क्रिकेट संघाच्या टी 20i कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Team India : आयर्लंड-इंग्लंड विरूद्धच्या टी 20i सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, श्रेयस अय्यर कर्णधार, वैभव सूर्यवंशीची एन्ट्री
Vaibhav Sooryavanshi and Shreyas Iyer Team India
Image Credit source: MB Media/Getty Images and Tv9 Bharatvarsh
| Updated on: Jun 06, 2026 | 2:13 PM

टीम इंडिया मायदेशात अफगाणिस्तान विरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळत आहे. त्यानंतर भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका नियोजित आहे. त्यानंतर टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर (India Tour Of  Ireland and England) जाणार आहे. टीम इंडिया या दोन्ही दौऱ्यांत टी 20i मालिका खेळणार आहे. बीसीसीआय निवड समितीने या दोन्ही मालिकांसाठी आज 6 जून रोजी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि सचिव देवजित सैकीया या दोघांनी मुंबईत बीसीसीआय मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित केलं. या दरम्यान सैकीया यांनी आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी 16 सदस्यीय संघ जाहीर केला. दोन्ही संघांविरुद्ध टीम इंडियाच्या त्याच 16 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

श्रेयस अय्यर टी 20i कर्णधारपदी

टीम इंडियात नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाचा सूर्यकुमार यादव याला टी 20i कर्णधारपदावरुन हटवण्यात आलं आहे. तर त्याच्या जागी मुंबईकर श्रेयस अय्यर याची भारतीय संघाच्या टी 20i कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. तसेच तिलक वर्मा याला उपकर्णधार करण्यात आलं आहे. तसेच सूर्याला दोन्ही टी 20i मालिकेसाठी भारतीय संघात स्थानही देण्यात आलेलं नाही.

वैभव सूर्यवंशी याला संधी

निवड समितीने दोन्ही मालिकांसाठी टीम इंडियात 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याचा समावेश केला आहे. वैभवने नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात जबरदस्त कामगिरी केली होती. त्यामुळे वैभवची भारताच्या वरिष्ठ संघात लवकरच निवड होणार, अशी चर्चा पाहायला मिळत होती. अखेर वैभवची एन्ट्री झाली आहे. तसेच या मालिकांसाठी काही नव्या नावांचाही समावेश करण्यात आला आहे.

आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यासाठी 16 खेळाडूंची नावं

आयर्लंड विरुद्धच्या टी 20i मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना,  26 जून, बेलफास्ट

दुसरा सामना,  28 जून, बेलफास्ट

इंग्लंड विरुद्धच्या टी 20i मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 1 जुलै

दुसरा सामना, 4 जुलै

तिसरा सामना, 7 जुलै

चौथा सामना,  9 जुलै

पाचवा आणि अंतिम सामना, 11 जुलै

आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20i सीरिजसाठी टीम इंडिया : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे, नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रिंस यादव, हर्षित राणा, रवी बिश्नोई आणि वैभव सूर्यवंशी.

Follow Us