ENG vs PAK : 4 सिक्स-10 फोर, हॅरी ब्रूकचा वर्ल्ड रेकॉर्ड, कॅप्टनची शतकासह ऐतिहासिक कामगिरी

Harry Brook World Record : हॅरी ब्रूक याने कर्णधार म्हणून अप्रतिम खेळी करत इंग्लंडला सेमी फायनलमध्ये पोहचवण्यात प्रमुख भूमिका बजावली. हॅरीने पाकिस्तान विरुद्ध शतक झळकावत वर्ल्ड रेकॉर्ड केला.

ENG vs PAK : 4 सिक्स-10 फोर, हॅरी ब्रूकचा वर्ल्ड रेकॉर्ड, कॅप्टनची शतकासह ऐतिहासिक कामगिरी
England vs Pakistan Harry Brook Century
Image Credit source: England Cricket X Account
| Updated on: Feb 25, 2026 | 2:22 AM

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 45 व्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने होते. दोन्ही संघांचा हा सुपर 8 फेरीतील दुसरा सामना होता. पाकिस्तानचा सुपर 8 फेरीतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे पाकिस्तानसाठी इंग्लंड विरुद्धचा सामना हा करो या मरो असा होता. तर श्रीलंकेला पराभूत करत सुपर 8 फेरीत विजयी सलामी देणाऱ्या इंग्लंडकडे सलग दुसरा सामना जिंकून सेमी फायनलचं तिकीट मिळवण्याची संधी होती. इंग्लंडने पाकिस्तानवर 2 विकेट्सने विजय मिळवला. इंग्लंडचा हा सुपर 8 फेरीतील सलग दुसरा विजय ठरला. इंग्लंडने यासह सेमी फायनलमध्ये धडक दिली. कॅप्टन हॅरी ब्रूक हा इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला. हॅरी ब्रूक याने या सामन्यात 200 च्या स्ट्राईक रेटने शतक केलं. ब्रूकने या शतकासह इतिहास घडवला.

हॅरी ब्रूकचा वर्ल्ड रेकॉर्ड, ठरला पहिलाच कर्णधार

हॅरीने 50 चेंडूंच्या मदतीने शतक पूर्ण केलं. हॅरीने शतकातील 100 पैकी 64 धावा या चौकार आणि षटकारांच्या मदतीने पूर्ण केल्या. हॅरीने 4 षटकार (24 धावा) आणि 10 चौकार (40) लगावले.  हॅरी ब्रूक याचं हे ऐतिहासिक शतक ठरलं. हॅरीचं हे टी 20i कारकीर्दीतील आणि टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिलं शतक ठरलं. तसेच ब्रूक टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत शतक करणारा पहिला कर्णधार ठरला. याआधी स्पर्धेच्या इतिहासात एकाही कर्णधाराला शतक करता आलं नव्हतं. विशेष म्हणजे ब्रूकने टीम अडचणीत असताना तसेच विजयी धावांचा पाठलाग करताना ही कामगिरी केली. त्यामुळे हॅरीचं या खेळीसाठी अभिनंदन केलं जात आहे.

इंग्लंडचा सेमी फायनलमध्ये प्रवेश

इंग्लंडने या विजयासह हॅरी ब्रूक याच्या नेतृत्वात मोठा विक्रम आपल्या नावावर केला. इंग्लंडची टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात उपांत्य फेरीत पोहणचण्याची सलग सर्वाधिक 5 वी वेळ ठरली. इंग्लंड 2016 पासून सातत्याने उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात यशस्वी ठरत आली आहे. यावरुन इंग्लंडच्या कामगिरीचा अंदाज येतो.

इंग्लंडचा सुपर 8मधील तिसरा आणि अंतिम सामना कधी?

दरम्यान इंग्लंड सुपर 8 फेरीतील आपला तिसरा आणि अंतिम सामना हा न्यूझीलंड विरुद्ध 27 फेब्रुवारीला खेळणार आहे. त्यामुळे आता इंग्लंड न्यूझीलंडला पराभूत करत विजयी हॅट्रिक करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.