
यजमान आणि गतविजेत्या टीम इंडियाने साखळी, सुपर 8 आणि सेमी फायनल असे 3 टप्पे पार करत अखेर आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. टीम इंडियाने गुरुवारी 5 मार्चला उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडवर 7 धावांनी मात करत फायनलचं तिकीट मिळवलं. टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध 254 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र इंग्लंडला 246 धावांपर्यंतच पोहचता आल. भारताने यासह विजय मिळवला आणि फायनलचं तिकीट फायनल केलं. आता टीम इंडिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 ट्रॉफीसाठी अंतिम फेरीत न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात पराभूत करत वर्ल्ड कप ट्रॉफीच्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकलं. आता अंतिम फेरीतील सामना हा रविवारी 8 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना जिंकून कोणता संघ विश्वविजेता ठरतो हे याची चाहत्यांना प्रतिक्षा असणार आहे. या निमित्ताने टीम इंडियाची टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीतील कामगिरी कशी राहिली आहे? हे आपण जाणून घेऊयात.
टीम इंडियाची टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचण्याची यंदाची सलग दुसरी तर एकूण चौथी वेळ ठरली आहे. टीम इंडियाने यासह स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा अंतिम फेरीत पोहचण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. टीम इंडियाने आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेतील 3 पैकी 2 अंतिम सामन्यांध्ये विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाला एकदाच अंतिम फेरीत पराभूत व्हावं लागलंय. तसेच टीम इंडिया गतविजेताही आहे. अशात आता टीम इंडिया न्यूझीलंडला पराभूत करुन सर्वाधिक 3 टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी करणार का हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.
टीम इंडियाने पहिल्याच टी 20i वर्ल्ड कप 2007 स्पर्धेतील अंतिम सामन्यात पाकिस्तानवर मात केली होती. भारताने तेव्हा महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात हा ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यानंतर टीम इंडियाने 2014 साली अंतिम फेरीत धडक दिली होती. तेव्हा श्रीलंकेने पराभूत केल्याने भारताला उपविेजेतेपदावर समाधाना मानावं लागलं होतं. त्यानंतर टीम इंडियाने थेट 10 वर्षांनी रोहित शर्मा याच्या नेतृत्वातत फायनल गाठली. भारताने दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत करुन दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची कामिगिरी केली. आता सूर्यकुमार यादव टीम इंडियाला टी 20i वर्ल्ड कप जिंकून देणारा तिसरा भारतीय कर्णधार ठरणार का? यासाठी सामन्याच्या निकालाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.