
टीम इंडियाचा युवा आणि सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीत फ्लॉप ठरला. अभिषेक साखळी फेरीत सलग 3 सामन्यात झिरोवर आऊट झाला. तर अभिषेकला तब्येतीमुळे एका सामन्याला मुकावं लागलं. मात्र त्यानंतरही टीम मॅनेजमेंटने अभिषेकला सुपर 8 मधील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संधी दिली. अभिषेकने इथेही निराशा केली. अभिषेकने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध काही धावा केल्या. मात्र अभिषेकला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यानंतरही अभिषेकला झिंबाब्वे विरूद्धच्या सामन्यात संधी देण्यात आली. अभिषेकने या सामन्यात टीम मॅनेजमेंटचा विश्वास खरा ठरवला आणि चाहत्यांची मनं जिंकली
अभिषेकला चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये झिंबाब्वे विरुद्ध सूर गवसला. अभिषेकने जोरदार फटकेबाजी करत अर्धशतक झळकावलं. झिंबाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा याने टाकलेल्या 11 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर अभिषेकने 1 धाव घेतली. अभिषेकने यासह अर्धशतक पूर्ण केलं. अभिषेकचं हे टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं. अभिषेकने 26 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. अभिषेकने या अर्धशतकी खेळीतील 36 धावा या चौकार आणि षटकारांच्या मदतीने पूर्ण केल्या. अभिषेकने अर्धशतकादरम्यान 4 सिक्स आणि 3 फोर लगावले. मात्र अभिषेक त्यानंतरही दुर्देवी ठरला. अभिषेकसोबत नक्की काय झालं? जाणून घेऊयात.
अभिषेकच्या टी 20i कारकीर्दीतील हे चेंडूंबाबत दुसरं सर्वात संथ अर्धशतक ठरलं. अभिषेकने त्याच्या टी 20i कारकीर्दीतील सर्वात संथ अर्धशतकी खेळी ही 33 चेंडूत केली होती. अभिषेकने तेव्हा झिंबाब्वे विरुद्धच ही कामगिरी केली होती.
टीम इंडिया 2024 साली टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर झिंबाब्वे विरुद्ध 5 सामन्यांची मालिका खेळली होती. अभिषेकने या टी 20i मालिकेतूनच आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. अभिषेक पदार्पणातील सामन्यात झिरोवर आऊट झाला होता. मात्र अभिषेकने दुसऱ्या सामन्यात जोरदार कमबॅक केलं. अभिषेकने हरारेत 33 चेंडूत पहिलंवहिलं अर्धशतक लगावलं होतं.
दरम्यान अभिषेक शर्मा याला झिंबाब्वे विरुद्ध मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र झिंबाब्बेने अभिषेकला रोखलं. अभिषेकने 183.33 च्या स्ट्राईक रेटने 55 धावा केल्या. अभिषेकने या दरम्यान 4 सिक्स आणि तितकेच चौकार लगावले.