DC vs MI : समीर रिझवीची चाबूक खेळी, दिल्लीचा सलग दुसरा विजय, मुंबईचा 6 विकेट्सने धुव्वा
Delhi Capitals vs Mumbai Indians Match Result IPL 2026 : समीर रिझवी याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून दिल्ली कॅपिट्ल्सला सलग दुसरा सामना जिंकून दिला आहे. समीरने अरुण जेटली स्टेडियममध्ये मुंबई विरुद्ध 90 धावांचं योगदान दिलं.

इम्पॅक्ट प्लेअर समीर रिझवी याने सलग दुसरं अर्धशतक ठोकून दिल्ली कॅपिट्ल्सला विजयी केलं आहे. आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) आठव्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. दिल्लीने अरुण जेटली स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सवर एकतर्फी विजय मिळवला. मुंबईने कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीसमोर 163 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दिल्लीने हे आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात आणि 11 बॉलआधी पूर्ण केलं. दिल्लीने 18.1 ओव्हरमध्ये
6 विकेट्स राखून 164 धावा केल्या. दिल्लीचा हा घरच्या मैदानातील पहिला आणि या मोसमातील सलग दुसरा विजय ठरला. समीर रिझवी हा या विजयाचा शिल्पकार ठरला. समीरने सर्वाधिक धावा केल्या. तसेच पाथुम निसांका यानेही योगदान दिलं.
दिल्लीने टॉस जिंकला, मुंबईची बॅटिंग
दिल्लीच्या बाजूने निर्णायक अशा नाणेफेकीचा कौल लागला. अक्षर पटेल याने मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. हार्दिक पंड्या याची तब्येत बरी नसल्याने सूर्यकुमार यादव याला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. सूर्यानेच मुंबईसाठी सर्वाधिक धावा केल्या. तसेच हिटमॅन रोहित शर्मा यानेही निर्णायक खेळी केली.
सूर्याने 36 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 3 फोरसह 51 रन्स केल्या. रोहितने 26 चेंडूत 35 धावांचं योगदान दिलं. नमन धीर याने 28, मिचेल सँटनर याने 18 तर कॉर्बिन बॉश याने 11 रन्स जोडल्या. मुंबईने अशाप्रकारे 6 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 162 धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीसाठी मुकेश कुमार याने 2 विकेट्स मिळवल्या. तर इतर चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
मुंबईची जबरदस्त सुरुवात
मुंबईने 163 धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीला पहिल्या 2 ओव्हरमध्ये 2 झटके दिले. दीपक चाहर याने केएल राहुल याला पहिल्याच ओव्हरमध्ये विकेटकीपर रायन रिकेल्टन याच्या हाती कॅच आऊट केलं. केएल 1 रन करुन आऊट झाला. तर बुमराहने दिल्लीच्या डावातील दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याच बॉलिंगवर नितीश राणा याला झिरोवर रन आऊट केलं. त्यामुळे दिल्लीची 2 आऊट 7 अशी स्थिती झाली.
त्यानंतर पाथुम निसांका, समीर रिझवी आणि डेव्हिड मिलर या तिघांनी दिल्लीला विजयी करण्यात योगदान दिलं. पाथमुने 30 बॉलमध्ये 44 रन्स केल्या. पाथुमने या खेळीत 1 षटकार आणि 6 चौकार लगावले. समीर रिझवी याने 51 चेंडूत 176.47 च्या स्ट्राईक रेटने 90 रन्स केल्या. समीरने या खेळीत 7 षटकार आणि 7 चौकार लगावले. समीरची या मोसमात सलग आणि एकूण 50 पेक्षा अधिक धावा करण्याची दुसरी वेळ ठरली.
लाईव्ह स्कोअरकार्ड
तर डेव्हिड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्स या दोघांनी उर्वरित धावा करुन दिल्लीला विजयापर्यंत पोहचवलं. मिलरने नाबाद 21 धावा केल्या. तर स्टब्सने नॉट आऊट 3 रन्स केल्या. मुंबईसाठी दीपक चाहर, मिचेल सँटनर आणि कॉर्बिन बॉश या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.