IPL 2026 Points Table: पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी

IPL 2026 Cricket Match Points Table: आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमातील पहिली फेरी पूर्ण झालीय. या पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी कोणता संघ विराजमान आहे? जाणून घ्या.

IPL 2026 Points Table: पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी
Mumbai Indians Flag
Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 02, 2026 | 5:36 AM

दिल्ली कॅपिट्ल्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) विजयी सलामी दिली. दिल्लीने बुधवारी 1 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करत आपल्या मोहिमेतील पहिला सामना जिंकला. दिल्लीचा हा लखनौ विरुद्धचा एकूण आणि सलग पाचवा विजय ठरला. तर लखनौ दिल्लीला रोखण्यात अपयशी ठरली. लखनौ घरच्या मैदानात सामना जिंकण्यात अपयशी ठरली. तर  दिल्ली या मोसमात घराबाहेर सामना जिंकणारी पहिली टीम ठरली.  दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यासह 19 व्या मोसमातील पहिल्या फेरीची सांगता झाली. या पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी कोण आहे? हे आपण जाणून घेऊयात.

पहिल्या फेरीतील 5 विजयी-अपयशी संघ कोणते?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स या 5 संघांनी  19 व्या मोसमातील पहिल्या फेरीत विजय मिळवलाय. तर गुजरात टायटन्स, कोलकाता नाईट रायडर्स, लखनौ सुपर जायंट्स,सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स हे 5 संघ 19 व्या मोसमातील आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने करण्यात अपयशी ठरले.

पहिल्या 5 सामन्यांची वैशिष्ट्य

आयपीएलच्या 19 व्या मोसमातील पहिल्या 5 सामन्यांत विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे. तसेच टॉस जिंकणाऱ्या संघानेच सामना जिंकला आहे. पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या मोसमातील चॅम्पियन टीम राजस्थान रॉयल्स पहिल्या स्थानी विराजमान आहे. राजस्थाननंतर पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिट्ल्स आहे. तर मुंबई इंडियन्स चौथ्या आणि पंजाब किंग्स पाचव्या स्थानी आहे.

राजस्थानचा मोठा विजय

आरसीबी, मुंबई आणि दिल्ली या तिन्ही संघांनी 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. पंजाबने 3 तर राजस्थानने 8 विकेट्सच्या फरकाने सामना आपल्या नावावर केला आहे. कोणता संघ अवव्ल स्थानी आणि कोणता संघ त्यानंतर हे नेट रनरेटच्या आधारे निश्चित होतं. नेट रनरेट हा एखाद्या संघाने किती चेंडूंआधी सामना जिंकला आहे यानुसार ठरतो. राजस्थानने 30 मार्चला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 128 धावांचं आव्हान हे 47 बॉलआधी पूर्ण केलं होतं. राजस्थान त्यामुळे इतर 4 संघांप्रमाणे 1 सामना जिंकूनही पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी विराजमान आहे.

Follow Us