RR vs LSG : वैभव-धुव्रचा झंझावात, लखनौचा 7 विकेट्सने धुव्वा, राजस्थान प्लेऑफच्या शर्यतीत कायम
Rajasthan Royals vs Lucknow Super Giants Match Result, IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 6 सामन्यांमधील विजयी धावांचा पाठलाग करताना चौथा विजय ठरला. राजस्थानने यासह प्लेऑफमधील आपलं आव्हान यशस्वीरित्या कायम राखलं आहे.

राजस्थान रॉयल्स लखनौ सुपर जायंट्स टीमला पराभूत करुन आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) घरच्या मैदानातील आपला शेवटचा सामना जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. लखनौ सुपर जायंट्सने राजस्थानसमोर जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये 221 धावांचं आव्हान ठेवलं होतं. राजस्थानने हे आव्हान वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेल या जोडीने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर सहज पूर्ण केलं. राजस्थानने 5 बॉलआधी विजयी आव्हान पूर्ण केलं. राजस्थानने 19.1 षटकांत 3 विकेट्स गमावून 225 धावा केल्या. राजस्थानचा हा या मोसमातील सातवा, लखनौ विरुद्धचा दुसरा आणि जयपूरमधील पहिला विजय ठरला. राजस्थानने यासह प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवलं आहे. तर लखनौ सुपर जायंट्सचा हा नववा पराभव ठरला. लखनौ 9 सामने गमावणारी या हंगामातील पहिली टीम ठरली.
लखनौची बॅटिंग, मार्शची फटकेबाजी
राजस्थानने टॉस जिंकून लखनौला बॅटिंगसाठी भाग पाडलं. लखनौच्या पहिल्या 4 फलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे लखनौला 220 धावांपर्यंत पोहचता आलं. लखनौला 200 पार पोहचवण्यात ओपनर मिचेल मार्श आणि जोश इंग्लिस या दोघांनी प्रमुख भूमिका बजावली. मिचेल मार्श याने सर्वाधिक धावा केल्या.
मिचेल मार्शने 57 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 11 फोरसह 96 रन्स केल्या. जोश इंग्लिस याने 29 चेंडूत 206.90 च्या स्ट्राईक रेटने 60 धावा केल्या. कॅप्टन ऋषभ पंत याने 35 तर निकोलस पूरन याने 16 धावांचं योगदान दिलं. राजस्थानसाठी यश राज पुंजा याने 2 विकेट्स मिळवल्या. तर जोफ्रा आर्चर याने 1 विकेट घेतली.
राजस्थानची जबरदस्त सुरुवात
राजस्थानला वैभव सूर्यवंशी आणि कॅप्टन यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीने ठोस सुरुवात मिळवून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 75 धावा जोडल्या. लखनौने 6.3 ओव्हरमध्ये राजस्थानला यशस्वीच्या रुपात पहिला झटका दिला. यशस्वीने 23 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 8 फोरसह 43 रन्स केल्या.
त्यानंतर वैभव आणि ध्रुव या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करुन राजस्थानचा विजय निश्चित केला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 105 रन्सची पार्टनरशीप केली. या भागीदारीमुळे राजस्थानचे 2 गुण निश्चित झाले. मात्र वैभवचं शतक हुकलं. वैभवने 38 बॉलमध्ये 10 सिक्स आणि 7 फोरसह 93 रन्स केल्या.
ध्रुवची निर्णायक खेळी
लिहान ड्री प्रिटोरियस 7 रन्स करुन आऊट झाला. तर ध्रुव आणि डोनोवन फरेरा या दोघांनी राजस्थानला विजयी केलं. डोनोवनने नाबाद 16 धावा केल्या. तर ध्रुवने निर्णायक भूमिका बजावली. ध्रुवने 38 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 3 फोरसह नॉट आऊट 53 रन्स केल्या. लखनौसाठी आकाश महाराज सिंग आणि मोहसिन खान या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
स्कोअरकार्ड
राजस्थानचं आव्हान कायम
दरम्यान राजस्थानने हा सामना जिंकून प्लेऑफमधील आपलं आव्हान कायम राखलंय. प्लेऑफसाठी 3 संघ निश्चित झाले आहेत. त्यामुळे एका जागेसाठी चुरस आहे.मात्र आता राजस्थानने लखनौ विरुद्ध जिंकून दावा मजबूत केला आहे. त्यामुळे आता राजस्थानकडे साखळी फेरीतील आपल्या शेवटच्या सामन्यात 24 मे रोजी मुंबई इंडियन्सला पराभूत करुन प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. त्यामुळे राजस्थान मुंबई विरुद्ध कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.