RR vs MI : राजस्थानची विजयी हॅट्रिक, मुंबईचा 27 धावांनी धुव्वा, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप

Rajasthan Royals vs Mumbai Indians Match Result IPL 2026 : मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयल्सला त्यांच्या घरच्या मैदानात एकूण तिसरा सामना जिंकण्यापासून रोखण्यात अपयशी ठरली आहे. यजमान संघाने पलटणवर 27 धावांनी मात करत सलग तिसरा सामना जिंकला आहे.

RR vs MI : राजस्थानची विजयी हॅट्रिक, मुंबईचा 27 धावांनी धुव्वा, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप
Rajasthan Royals Vaibhav Sooryavanshi IPL 2026
Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 08, 2026 | 3:48 AM

राजस्थान रॉयल्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) आपली विजयी घोडदौड कायम राखत धमाका केला आहे. राजस्थानने या मोसमातील 13 व्या सामन्यात मंगळवारी 7 एप्रिलला मुंबई इंडियन्सवर एकतर्फी विजय मिळवला आहे. राजस्थानने रियान पराग याच्या नेतृत्वात मुंबईचा 27 धावांनी धुव्वा उडवला आहे. राजस्थानने मुंबईसमोर 151 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र मुंबईला 9 विकेट्स गमावून 123 धावांपर्यंतच पोहचता आलं. राजस्थानने अशाप्रकारे तिसरा विजय मिळवला. राजस्थानने यासह विजयी हॅट्रिक पूर्ण केली. तर मुंबईचा हा 3 सामन्यांमधील सलग आणि दुसरा पराभव ठरला.

पावसामुळे 11 ओव्हरचा खेळ

गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्यातील 160 मिनिटांचा खेळ वाया गेला. सामना सुरु होण्याची वेळ साडे सात होती. मात्र प्रत्यक्ष खेळाला 10 वाजून 10 मिनिटांनी सुरुवात झाली. त्यामुळे 11 षटकांचाच सामना खेळवण्यात येणार असल्याचं निश्चित झालं. राजस्थानने या सामन्यात यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी आणि रियान पराग या तिघांनी केलेल्या खेळीच्या जोरावर राजस्थानने 3 विकेट्स गमावून 11 षटकांत 150 धावा केल्या.

वैभव सूर्यवंशी याने 39 आणि रियान पराग याने 20 धावा जोडल्या. ध्रुव जुरेल 2 धावांवर बाद झाला. तर शिमरॉन हेटमायर आणि यशस्वी जैस्वाल जोडी नाबाद परतली. राजस्थानसाठी यशस्वी जैस्वाल याने सर्वाधिक आाणि नाबाद 77 धावा केल्या. तर हेटमायरने 6 रन्स केल्या. मुंबईसाठी अल्लाह गजनफर याने 2 विकेट्स मिळवल्या. तर शार्दूलने वैभवला आऊट करत एकमेव मात्र महत्त्वाची विकेट घेतली.

मुंबईची बॅटिंग

मुंबईच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी विजयी धावांचा पाठलाग करताना निराशा केली. रोहित शर्मा 5, सूर्यकुमार यादव 6 आणि रायन रिकेल्टन याने 8 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन हार्दिक पंड्या 9 रन्सवर आऊट झाला. या प्रमुख फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.  नमन धीर आणि शेरफेन रुदरफोर्ड या दोघांनी प्रत्येकी 25-25 धावा जोडल्या. मात्र इतरांनी साथ न मिळाल्याने मुंबईला 9 विकेट्स गमावून 123 धावाच करता आल्या. राजस्थानसाठी रवी बिश्नोई, नांद्रे बर्गर आणि संदीप शर्मा या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर जोफ्रा आर्चर आणि तुषार देशपांडे या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

स्कोअरकार्ड

राजस्थानची पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप

दरम्यान राजस्थानने सलग तिसऱ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये कमाल केली. राजस्थान पंजाब किंग्सला पछाडत पहिल्या स्थानी पोहचली आहे. राजस्थानचा नेट रनरेट हा +2.403 असा झाला आहे.

Follow Us