IPL 2026, CSK vs SRH: महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? नाणेफेकीनंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडने स्पष्ट केलं
आयपीएल 2026 स्पर्धेच्या 63व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आले आहेत. हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. दुसरीकडे, या सामन्यात महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही याबाबत चर्चा होती. नाणेफेक होताच ऋतुराज गायकवाडने स्पष्ट केलं.

आयपीएल 2026 स्पर्धेत प्लेऑफची रंगत वाढली आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ या शर्यतीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांना या सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे. या सामन्याचं महत्त्व किती आहे हे यावरून कळून येतं. या सामन्यात महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? यावरूनही चर्चा होती. या हंगामात एकही सामना न खेळलेल्या धोनीने 18 मे रोजी संध्याकाळी चेन्नईमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी सराव केला. घरच्या मैदानावर हा सामना खेळून आयपीएलमधून निवृत्त होईल, असं बोललं जात होतं. त्यामुळे महेंद्रसिंहबाबत चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे नाणेफेकीवेळी सर्वांच्या नजरा या कर्णधार ऋतुराज गायकवाडकडे होत्या. प्लेइंग 11 बाबत काय घोषणा करतो याकडे कान लागून होते. पण महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांचा पुन्हा हिरमोड झाला. या सामन्यातही महेंद्रसिंह धोनी खेळणार नसल्याचं त्याने सांगितलं.
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला की, ‘आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करत आहोत. खेळपट्टी थोडी कोरडी दिसत आहे आणि आम्हाला एक चांगली धावसंख्या उभारायची आहे. अगदी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या मागच्या सामन्यातही फलंदाजीसाठी ही सर्वोत्तम खेळपट्टी नव्हती. काहीही गुंतागुंतीचे नाही आणि आम्हाला खेळ सोपा ठेवायचा आहे. एमएस अजूनही संघात आहे, पण तो हा सामना खेळण्यासाठी पुरेसा तंदुरुस्त नाही. आमच्या संघात एक बदल आहे.’ त्यामुळे महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांना आता शेवटच्या सामन्याची वाट पाहावी लागणार आहे. चेन्नई सुपर किंग्सचे दोन सामने शिल्लक आहेत. चेन्नई सुपर किंग्स संघ सध्या 12 सामन्यांतून 12 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबादला हरवले, तर ते अव्वल चार संघांमध्ये आपले स्थान निश्चित करेल.
2021 पासून महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू आहे. त्याला आता पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. तेव्हा महेंद्रसिंह धोनी चेन्नईत शेवटचा आयपीएल सामना खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण आता या सामन्यातही खेळत नसल्याने पुढच्या पर्वातही संघाचा भाग असेल असं बोललं जात आहे. कारण घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादचा हा शेवटचा सामना आहे.