Ishan Kishan Captain: इशान किशन होणार सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार? पॅट कमिन्सने घेतला असा निर्णय

आयपीएल 2026 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचा प्रवास एलिमिनेटर फेरीतच संपुष्टात आला. आता स्पर्धा संपली असून पुढच्या पर्वाची तयारी सुरू झाली आहे. असं असताना पुढच्या पर्वात कमिन्सऐवजी संघाची धुरा इशान किशनच्या खांद्यावर असण्याची शक्यता वाढली आहे.

Ishan Kishan Captain: इशान किशन होणार सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार? पॅट कमिन्सने घेतला असा निर्णय
Ishan Kishan Captain: इशान किशन होणार सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार? पॅट कमिन्सने घेतला असा निर्णय
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Jun 03, 2026 | 5:18 PM

आयपीएल 2026 स्पर्धेच्या सुरूवातीला पॅट कमिन्सच्या गैरहजेरीत इशान किशनने संघाची धुरा सांभाळली. त्याने संघाला चांगलं नेतृत्व दिलं. स्पर्धेच्या मध्यात पॅट कमिन्स परतला आणि धुरा त्याच्याकडे गेली. आता आयपीएल 2027 स्पर्धेसाठी कंबर कसली जात आहे. यासाठी 10 महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. असं असताना कर्णधारपदाची माळ इशान किशनच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. त्याला फुलटाईम कर्णधारपद सोपण्यात येण्याची शक्यता वाढली आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादने चांगली कामगिरी केली. मग अचानक असं काय झालं की पुढच्या पर्वात त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतलं जाणार आहे. रिपोर्टनुसार, पॅट कमिन्स आयपीएलच्या पुढच्या पर्वात खेळणं कठीण आहे. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे असा निर्णय घेतला जाणार आहे.

पॅट कमिन्सने दिले संकेत..

पॅट कमिन्सने एका कार्यक्रमात जाहीरपणे सांगितलं की, पुढच्या वर्षी होणाऱ्या एशेज मालिका आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धेला प्राधान्य देणार आहे. त्यामुळे फ्रेंचायझी क्रिकेटमधून माघार घेण्याची शक्यता वाढली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी टी20 फ्रेंचायझीमधून माघार घेतात. अशी अनेक उदाहरणं आतापर्यंत पाहिली आहे. पॅट कमिन्स म्हणाला की, ‘मला पुढील वर्षी काहीतरी सोडावे लागेल, पण ते निश्चितपणे कसोटी आणि एकदिवसीय विश्वचषक नसतील. मी त्यावेळेस त्यावर निर्णय घेईन. गोष्टी बदलू शकतात. मला काही दुखापती आहेत आणि मी सध्या कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. माझे प्राधान्य नेहमीच कसोटी सामने आणि एकदिवसीय विश्वचषक असेल. जर मी संपूर्ण भारतभर खेळलो, तर मला ॲशेस मालिकेपूर्वी ब्रेक घ्यावा लागेल.’

आयपीएल 2026 स्पर्धेत पॅट कमिन्सच्या नेतृत्वात संघाने चांगली कामगिरी केली. पण त्याची वैयक्तिक कामगिरी मात्र निराशाजनक राहिली. त्याने आठ सामन्यात फक्त 8 विकेट घेतल्या. तसेच त्याचा इकोनॉमी रेट हा प्रति षटक 11च्या वर होता. एलिमिनेटर सामन्यात राजस्थान विरुद्ध त्याने 64 धावा दिल्या. त्यामुळे संघावर दबाव वाढला आणि विजयी आव्हान गाठताना दमछाक झाली. आता पॅट कमिन्सच्या वक्तव्यानंतर इशान किशनकडे पूर्णवेळ कर्णधारपद येऊ शकते. त्याने आयपीएल 2026 मध्ये आठ सामन्यात संघाचं नेतृत्व केलं आहे. त्यात पाच सामन्यात विजय आणि तीन सामने गमावले आहेत.

Follow Us