
टीम इंडिया शुबमन गिल याच्या नेतृत्वात 20 जूनपासून इंग्लंड विरुद्ध एकूण 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय कसोटी संघात तब्बल 7 वर्षांनंतर त्रिशतकवीर करुण नायर याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच करुणला इंडिया ए मध्येही संधी देण्यात आली आहे. भारताचे काही खेळाडू इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेआधी काही सराव सामने खेळणार आहे. इंडिया ए इंग्लंड लायन्स विरुद्ध 2 अनऑफिशीयल टेस्ट मॅचेस खेळणार आहे. यातील पहिला सामना हा 30 मे ते 2 जून दरम्यान सेंट लॉरेन्स ग्राउंड येथे आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार 3.30 वाजता टॉस झाला. इंग्लंड ए च्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार जेम्स र्यू याने फिल्डिंगचा निर्णय घेत इंडिया एला बॅटिंगसाठी भाग पाडलं. तसेच टीम इंडिया ए च्या नेतृत्वाची जबाबदारी ही अभिमन्यू इश्वरन याच्याकडे आहे.
इंडिया ए टीममध्ये इंग्लंड लायन्स विरूद्धच्या या सामन्यासाठी मुंबईच्या 2 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. ऑलराउंडर शार्दूल ठाकुर आणि फलंदाज सर्फराज खान या दोघांना संधी मिळाली आहे.
करुण नायर याला भारतीय कसोटी संघात अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुनरागमनाची संधी मिळाली. तसेच इंडिया एमध्येही त्याला संधी देण्यात आली. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेला आता मोजून 21 दिवस राहिले आहेत. त्याआधी करुणकडे इंग्लंड लायन्स विरुद्ध 2 सामन्यांमध्ये जोरदार कामगिरी करुन साऱ्यांचं लक्ष वेधून घेण्यासह निवड समितीचा त्याला देण्यात आलेला संधीचा निर्णय योग्य ठरवण्याची संधी आहे. आता करुण कशी कामगिरी करतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दरम्यान करुण नायर याने आयपीएलच्या 18 व्या मोसमात दिल्ली कॅपिट्ल्सचं प्रतिनिधित्व केलं. करुणने या हंगामातील सामन्यांमध्ये दिल्लीसाठी 24.75 च्या सरासरीने एकूण 198 धावा केल्या.
इंग्लंड लायन्स प्लेइंग इलेव्हन: टॉम हेन्स, बेन मॅककिनी, एमिलियो गे, मॅक्स होल्डन, जेम्स र्यू (कर्णधार आणि विकेटकीपर), डॅन मॉसली, रेहान अहमद, जमान अख्तर, एडी जॅक, जोश हल आणि अजित डेल.
इंडिया ए प्लेइंग ईलेव्हन : अभिमन्यू इश्वरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, करुण नायर, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, शार्दूल ठाकूर, हर्ष दुबे, अंशुल कंबोज, हर्षित राणा आणि मुकेश कुमार.