LSG vs DC : लखनौच्या पराभवानंतर संजीव गोयंका यांची पोस्ट व्हायरल, टीम आणि कॅप्टनबाबत काय म्हटलं?

Sanjiv Goenka X Post LSG vs DC IPL 2026 : दिल्ली कॅपिट्ल्स विरूद्धच्या पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांनी कॅप्टन ऋषभ पंत आणि टीमचा उल्लेख करुन एक पोस्ट केली आहे. जाणून घ्या गोयंका यांनी या पोस्टमध्ये काय म्हटलंय.

LSG vs DC : लखनौच्या पराभवानंतर संजीव गोयंका यांची पोस्ट व्हायरल, टीम आणि कॅप्टनबाबत काय म्हटलं?
LSG vs DC IPL 2026 Sanjiv Goenka
Image Credit source: Social Media and Pti
| Updated on: Apr 02, 2026 | 8:24 PM

लखनौ सुपर जायंट्स आयपीएल स्पर्धेतील 19 व्या हंगामात विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली. इम्पॅक्ट प्लेअर समीर रिझवी याने बुधवारी 1 एप्रिलला नाबाद 70 धावा करत दिल्ली कॅपिट्ल्सला विजय मिळवून दिला. दिल्लीचा हा या पर्वातील पहिलाच आणि लखनौ विरुद्धचा एकूण आणि सलग पाचवा विजय ठरला. लखनौची जर्सी बदलली मात्र त्यांच्या कामगिरीत काही बदल झाला नाही. लखनौ दिल्ली विरुद्ध सलग आणि पाचव्यांदा अपयशी ठरली. लखनौच्या या पराभवानंतर एलएसजीचे सर्वेसर्वा संजीव गोयंका यांनी त्यांच्या नेहमीच्याच स्टाईलने भर मैदानात कर्णधार ऋषभ पंत आणि कोचिंग स्टाफसह चर्चा केली. गोयंकांनी कॅप्टन पंत आणि कोचिंग स्टाफवर पराभवाचा राग काढल्याचं म्हटलं जात आहे. अशात आता गोयंकांनी एक एक्स पोस्ट केली आहे.

गोयंका यांनी एक्स पोस्टमधून पहिल्या सामन्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहिलेल्या चाहत्यांचे समर्थनासाठी आभार मानले आहेत. तसेच गोयंका यांनी कर्णधार ऋषभ पंत आणि संपूर्ण संघावर आपल्याला विश्वास असल्याचं जाहीरपणे म्हटलंय.

गोयंकांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये काय म्हटलंय?

“हा एक मोठा हंगाम आहे. हे क्षण उभारणीच्या प्रक्रियेचा भाग आहेत”, असं गोयकांनी म्हटलंय. तसेच कॅप्टन आणि टीमवर मला विश्वास आहे. ते जोरदार पलटवार करतील, असा विश्वास गोयकांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केला आहे.

गोयंकांचा चाहत्यांना शब्द, काय म्हणाले?

तुम्ही एकाना (क्रिकेट स्टेडियम) इथे दिलेल्या पाठिंब्यासाठी आभारी. आम्ही जोरदार कमबॅक करु. लखनौचा या हंगामातील बराच प्रवास बाकी आहे”, असंही गोयंका यानी म्हंटलं.

गोयंकांचा डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न?

गोयंका यांचा या पोस्टमधून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे. सामन्यानंतर जस्टिन लँगर, ऋषभ पंत आणि इतरांसह गोयंका यांनी चर्चा केली. गोयंका यांनी पराभवामुळे या सर्वांवर नाराजी व्यक्त केल्याचं म्हटलं जात आहे. गोयंका यांनी आपल्या टीममधील जबाबदार व्यक्तींसह सर्वांसमोर चर्चा न करता 4 भिंतीत करावी, असा सल्ला नेटकऱ्यांनी दिला आहे.

सामन्यात काय झालं?

दरम्यान दिल्लीने लखनौवर 6 विकेट्सने विजय मिळवला. लखनौने दिल्लीसमोर 142 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दिल्लीने हे आव्हान समीर रिझवी याच्या खेळीच्या जोरावर सहज पूर्ण केलं. दिल्लीने 17.1 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 145 धावा केल्या.

Follow Us