
पुणे : सध्या महाराष्ट्र प्रीमिअर लीग स्पर्धा सुरु आहे. गुरुवारी पुणेरी बाप्पा आणि सोलापूर रॉयल्समध्ये या टुर्नामेंटमधील 12 वा सामना झाला. या स्पर्धेत ऋतुराज गायकवाडच्या पुणेरी बाप्पा टीमने दमदार सुरुवात केली होती. पण आता त्यांची गाडी कुठेतरी अडखळलीय असं वाटतय. सोलापूर रॉयल्सच्या तुलनेत पुणेरी बाप्पा बलवान संघ मानला जातो. पण कालच्या मॅचमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळालं. सोलापूर रॉयल्स टीमने पुणेरी बाप्पाला चांगली टक्कर देत विजय खेचून आणला.
पुणेरी बाप्पा टीमने पहिली बॅटिंग केली. पुणेरी बाप्पाकडून लोअर ऑर्डरमध्ये खेळणाऱ्या सूरज शिंदेने दमदार बॅटिंग केली. त्याने 23 चेंडूत 44 धावा फटकावल्या. यात 2 फोर, 4 सिक्स होते.
पुणेरी बाप्पाने किती धावा केल्या?
पुणेरी बाप्पाकडून सूरज शिंदे व्यतिरिक्त ऋतुराज गायवाडने 21 चेंडूत 25 आणि रोहन दामलेने 22 चेंडूत 24 धावा केल्या. अन्य फलंदाज अपयशी ठरले. पुणेरी बाप्पाने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 140 धावा केल्या. सोलापूरकडून प्रथमेश गायकवाड, प्रणय सिंहने प्रत्येकी 2 तर सुनील यादवने 3 विकेट घेतले.
सोलापूरच्या स्वप्निल फुलपगारेची दमदार बॅटिंग
सोलापूरची सुरुवातही खराब झाली होती. ओपनर यश नाहर शुन्यावर आऊट झाला होता. पण स्वप्निल फुलपगारेने एकबाजू लावून धरली. त्याने 52 चेंडूत 68 धावा तडकावल्या. यात 4 फोर, 3 सिक्स होते. त्याला अवधूत दांडेकर 20 धावा आणि विशांत मोरे 23 धावा यांनी साथ दिली. स्वप्निलच्या खेळामुळे सोलापूर रॉयल्सने लास्ट ओव्हरमध्ये विजयी लक्ष्य गाठलं. सोलापूर रॉयल्सने 19.1 ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावून विजयी लक्ष्य गाठलं. ऋतुराज गायकवाडच्या पुणेरी बाप्पाचा हा सलग दुसरा पराभव आहे.