
आयपीएल 2026 स्पर्धेची लगबग सुरू असताना राजस्थान रॉयल्स संघाचा मालक बदलला असल्याच्या बातम्या समोर आल्या. राजस्थान रॉयल्स संघ जवळपास 15,290 कोटी रुपयांना विकला गेला. त्यामुळे क्रीडाविश्वात चर्चांना उधाण आलं आहे. ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा विचार करता ही रक्कम 2.3 बिलियन डॉलर इतकी आहे. पण ऑस्ट्रेलियन डॉलर्स सांगण्याचं कारण काय ते समजून घ्या. या डीलमुळे दिवंगत क्रिकेटपटू शेन वॉर्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या आर्थिक व्यवहारामुळे शेन वॉर्नच्या मुलांचं भलं झालं आहे. कारण त्यांना यातून आर्थिक फायदा मिळणार आहे. शेन वॉर्नने केलेली 3 टक्के गुंतवणूक त्यांच्या कामी आली आहे. रिपोर्टनुसार, शेन वॉर्नला प्रत्येकी वर्षी 657000 डॉलर पगार दिला गेला होता. पण त्याने दूरदृष्टी ठेवली आणि प्रत्येक वर्षी संघात 0.75 टक्के भागीदारी मागितली. शेन वॉर्न 2008 ते 2011 या चार वर्षे खेळला म्हणून त्याची भागीदारी 3 टक्के झाली. तेव्हा गुंतवणूक फार काही मानली गेली नाही. पण आज 19 वर्षांनी त्याचं फळ मिळालं आहे.
आयपीएल 2026 स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अमेरिकेच्या मोठे उद्योगपती काल सोमानी यांनी जवळपास 1.63 बिलियल डॉलर (अंदाजे 15,290 कोटी रुपये) मोजून राजस्थान रॉयल्स संघाचे 100 टक्के भागीदारी घेतली. त्यामुळे या डीलमधील 3 टक्के रक्कम ही शेन वॉर्नच्या कुटुंबियांना मिळणार आहे. ही रक्कम जवळपास 460 कोटी रूपये असल्याचं सांगितलं जात आहे. ही रक्कम शेन वॉर्नच्या मुलांना मिळेल. ब्रूक वॉर्न, जॅक्सन वॉर्न आणि समर वॉर्न यांना ही रक्कम मिळेल असं बोललं जात आहे.
2008 मध्ये राजस्थान रॉयल्सने वॉर्नला करारबद्ध केले, तेव्हा त्याला कर्णधारपदच नाही, तर संघाच्या क्रिकेट कामकाजाची संपूर्ण जबाबदारीही देण्यात आली होती.त्याने खेळाडू, कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावली. वॉर्नने संघासोबतच्या आपल्या करारामध्ये एक अट घातली होती, त्याचा फायदा आता दोन दशकांनंतर त्याच्या कुटुंबाला मिळणार आहे.या करारानुसार वॉर्नला संघासाठी खेळलेल्या प्रत्येक वर्षासाठी 0.75 टक्के हिस्सा देण्यात आला. शेन वॉर्नचं 2022 या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं होतं. वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाल्याने क्रीडाविश्वात शोक व्यक्त केला गेला. कारण शेन वॉर्न हा क्रीडाजगातील सर्वोत्तम फिरकीपटू होता.