SA vs NZ : फिन एलनचं चाबूक शतक, न्यूझीलंड फायनलमध्ये, दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने धुव्वा

South Africa vs New Zealand, 1st Semi Final Match Result : न्यूझीलंड क्रिकेट टीमने फिन एलन याच्या विस्फोटक शतकाच्या जोरावर अंतिम फेरीत धडक दिली आहे. न्यूझीलंडने यासह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 पराभवांची वसुली केली.

SA vs NZ : फिन एलनचं चाबूक शतक, न्यूझीलंड फायनलमध्ये, दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने धुव्वा
Tim Seifert and Finn Allen SA vs NZ Semi Final
Image Credit source: Social Media
| Updated on: Mar 04, 2026 | 10:48 PM

न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवत आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. न्यूझीलंडने कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात 9 विकेट्सने दणदणीत असा विजय साकारला. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडसमोर 170 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. न्यूझीलंडने हे आव्हान कोणत्याही अडचणींशिवाय सहज पार केलं.  फिन एलन याने चौकार ठोकत शतक पूर्ण केलं आणि टीमला फायनलमध्ये पोहचवलं. न्यूझीलंडने हे विजयी आव्हान 43 बॉलआधी पूर्ण केलं. न्यूझीलंडने 12.5 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 173 रन्स केल्या.  न्यूझीलंड या विजयासह वर्ल्ड कपच्या आणखी जवळ पोहचली आहे. तर दक्षिण आफ्रिकेचं पराभवासह स्पर्धेतून पॅकअप झालं आहे.  दक्षिण आफ्रिका साखळी आणि सुपर 8 फेरीत अजिंक्य राहत इथवर पोहचली होती. मात्र एका पराभवासह दक्षिण आफ्रिकेचं आव्हान संपुष्टात आलं. आता न्यूझीलंड भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील विजयी संघाविरुद्ध अंतिम फेरीत वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी भिडणार आहे. उपांत्य फेरीतील दुसरा सामना हा गुरुवारी 5 मार्चला होणार आहे. तर 8 मार्चला रविवारी अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे.

सामन्यात काय झालं?

न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मार्को यान्सेन याने दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक आणि नाबाद 55 धावा केल्या. डेवाल्ड ब्रेव्हीस याने 34 तर ट्रिस्टन स्टब्स याने 29 धावांचं योगदान दिलं. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 169 धावा केल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज या धावांचा यशस्वी बचाव करणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र न्यूझीलंडच्या सलामी जोडीनेच सामना एकतर्फी केला.

पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी

न्यूझीलंडकडून 170 धावांचा पाठलाग करायला आलेल्या फिन एलन आणि टीम सायफर्ट या सलामी जोडीने कहर केला. न्यूझीलंडच्या सलामी जोडीने 9.1 ओव्हरमध्ये 117 धावांची शतकी भागीदारी केली. यासह न्यूझीलंडचा विजय निश्चित झाला. टीम सायफर्ट आऊट होताच ही जोडी ब्रेक झाली. कगिसो रबाडा याने सायफर्टला 58 रन्सवर बोल्ड केलं.

त्यानंतर फिन एलन आणि रचीन रवींद्र या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 22 बॉलमध्ये नॉट आऊट 56 रन्सची पार्टनरशीप केली. न्यूझीलंडने अशाप्रकारे विजय मिळवला. रचीनने 13 रन्स केल्या. तर फिनने 33 चेंडूत 8 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद शतक झळकावलं.

न्यूझीलंडकडून एकाच विजायसह दक्षिण आफ्रिकेचा हिशोब

दरम्यान याआधी दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील पाचही सामन्यात पराभव केला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिका न्यूझीलंड विरुद्ध टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी षटकार लगावण्यासाठी सज्ज होती. मात्र न्यूझीलंडने एकाच विजयासह या 5 पराभवांचा हिशोब केला.

Follow Us