Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीला पाणी देताना पाहून प्रशिक्षक भावूक; टीम इंडियाच्या व्यवस्थापनाला हुकूमशाही म्हटलं!

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. यामुळे त्याचे बालपणीचे प्रशिक्षक मनीष ओझा भावुक झाले असून, त्यांनी टीम इंडियाच्या मॅनेजमेंटवर टीका केली आहे.

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीला पाणी देताना पाहून प्रशिक्षक भावूक; टीम इंडियाच्या व्यवस्थापनाला हुकूमशाही म्हटलं!
Vaibhav Suryavanshi coach Manish Ojha
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 13, 2026 | 2:26 AM

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत १५ वर्षीय युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीला अद्याप एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही. मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये त्याला बाहेर बाकावरच बसावे लागले असून, तो मैदानात केवळ खेळाडूंना पाणी देताना दिसला आहे. वैभवला सातत्याने असं बाकावर बसवलेलं पाहून त्याचे बालपणीचे प्रशिक्षक मनीष ओझा भावूक झाले आहेत. त्यांनी भारतीय संघ व्यवस्थापनाच्या या कार्यपद्धतीवर थेट टीका करत याला ‘हुकूमशाही वृत्ती’ म्हटलं आहे. इतक्या प्रतिभावान खेळाडूला केवळ बाकावर बसवून ठेवणं अजिबात योग्य नसल्याचं ओझा यांचं म्हणणं आहे.

वैभवच्या प्रशिक्षकांनी काय म्हटलंय?

‘स्पोर्ट्स नाऊ’शी बोलताना मनीष ओझा यांनी वैभव सूर्यवंशीचं भरभरून कौतुक केलं. ते म्हणाले, “वैभव सूर्यवंशी म्हणजे एखाद्या वादळासारखा आहे. त्याच्याशी टक्कर घेण्याचा प्रयत्न करणारा अखेरीस मोडून पडेल. आज नाही तर उद्या हेच घडणार आहे.”

Loading...

भारतीय संघाचं सध्याचं व्यवस्थापन खेळाडूंना बाकावर बसवून ठेवल्यानेच ते तयार होतात, असा विचार करत असल्याचा आरोपही ओझा यांनी केला. “क्रिकेटमधील कोणत्याही दिग्गजाशी बोलून पाहा. जर तुम्हाला पुढची पिढी घडवायची असेल, तर खेळाडूंना प्रत्यक्ष मैदानावर खेळण्याची संधी द्यावी लागेल आणि त्यांना वेगवेगळ्या परिस्थितींशी जुळवून घेण्यासाठी तयार करावं लागेल, असंच प्रत्येक जण सांगेल,” असंही ते म्हणाले.

संघ व्यवस्थापनावर थेट निशाणा

ओझा यांनी पुढे भारतीय संघाच्या व्यवस्थापनावर थेट टीका केली. “सतत बाकावर बसून राहिल्याने कोणताही खेळाडू आजवर तयार झालेला नाही आणि भविष्यातही होणार नाही. वैभव बाहेर बसून खेळाडूंना फक्त पाणी देत आहे. भारतीय संघाचं सध्याचं व्यवस्थापन एक प्रकारे हुकूमशाही करत असल्याचं मला वाटतं. त्यांच्या मनात येईल तेच ते करतात,” अशी उद्विग्नता ओझा यांनी बोलून दाखवली.

वैभव सूर्यवंशीची टी-२० आंतरराष्ट्रीय कारकीर्द

वैभव सूर्यवंशीच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास, त्याला ८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. या सामन्यांमध्ये त्याने ३०.७५ च्या सरासरीने २४६ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट १८६ पेक्षा अधिक आहे. त्याने आतापर्यंत २ अर्धशतकं झळकावली असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १८ षटकार आणि २२ चौकार आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या या मालिकेत भारतीय संघाला अजून २ टी-२० सामने खेळायचे आहेत. त्यामुळे उर्वरित सामन्यांमध्ये तरी युवा आणि प्रतिभावान वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us