Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी आता भारताच्या जर्सीत खेळणार, पाहा वेळापत्रक

India A Tour Of Sri Lanka 2026 : इंडिया ए टीम तिलक वर्मा याच्या नेतृत्वात श्रीलंका दौऱ्यात एकूण 4 सामने खेळणार आहे. तिलक वर्मा इंडिया ए टीमचं नेतृत्व करणार आहे. जाणून घ्या वेळापत्रक.

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी आता भारताच्या जर्सीत खेळणार, पाहा वेळापत्रक
Vaibhav Sooryavanshi India
Image Credit source: GETTY
| Updated on: Jun 01, 2026 | 8:23 PM

आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात (IPL 2026 Final) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात टायटन्सला पराभूत करुन सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली. आरसीबीने ट्रॉफी जिंकली. मात्र बॅटिंग संबंधित सर्व पुरस्कार हे राजस्थान रॉयल्सचा 15 वर्षीय सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) जिंकण्यात यशस्वी ठरला. वैभवची आयपीएलचा संपूर्ण मोसम खेळण्याची पहिलीच वेळ ठरली. वैभवने या संधीचा पूर्ण फायदा घेत अनेक विक्रम रचले. वैभव ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. वैभवने 16 सामन्यांमध्ये एकूण 776 धावा केल्या. आयपीएलच्या 19 व्या मोसमाची सांगता झाल्यानंतर वैभव सूर्यवंशी एक्शन मोडमध्ये केव्हा दिसणार? याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना आहे. या निमित्ताने वैभव मैदानात केव्हा उतरणार आणि कुणाविरुद्ध खेळताना दिसणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.

वैभवची इंडिया ए टीममध्ये निवड

वैभव आणि भारताचे अनेक युवा खेळाडू आयपीएल 2026 स्पर्धेनंतर श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत. वैभवसह 19 व्या मोसमात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या युवा खेळाडूंना इंडिया ए टीममध्ये संधी देण्यात आली आहे. इंडिया श्रीलंका दौऱ्यात ट्राय सीरिज खेळणार आहे. या मालिकेत अफगाणिस्तान ए आणि यजमान श्रीलंका ए संघांचा सहभाग असणार आहे. तिलक वर्मा या मालिकेत इंडियाचं ए टीमचं नेतृत्व करणार आहे. तर रियान पराग याच्या जागी ऋतुराज गायकवाड याचा समावेश करण्यात आला आहे. ऋतुराज उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.

इंडिया ए टीम या दौऱ्यात अफगाणिस्तान ए आणि श्रीलंका ए विरुद्ध प्रत्येकी 2-2 असे एकूण 4 सामने खेळणार आहे. इंडिया ए टीमच्या मोहिमेची सुरुवात 9 जूनपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांची वैभव सूर्यवंशी याच्या कामगिरीकडे करडी नजर असणार आहे.

इंडिया ए टीमचं ट्राय सीरिजचं वेळापत्रक

9 जून, विरुद्ध श्रीलंका ए, दांबुला

11 जून, विरुद्ध अफगाणिस्तान ए, दांबुला

15 जून, विरुद्ध श्रीलंका ए, दांबुला

17 जून, विरुद्ध अफगाणिस्तान ए, दांबुला

ट्राय सीरिजसाठी इंडिया ए टीम : तिलक वर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, आयुष बडोनी, निशांत सिंधु, सूर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), कुमार कुशाग्र (विकेटकीपर), विप्रज निगम, यश ठाकुर, युद्धवीर सिंह, अंशुल कंबोज, अर्शद खान आणि अनुकूल रॉय.

Follow Us