IPL 2026: आयपीएल गुणतालिकेतील टॉप 2 मध्ये कोणाला मिळणार संधी? दोन जागांसाठी तीन संघात चुरस

आयपीएल 2026 स्पर्धेतील प्लेऑफच्या चार जागांसाठी तीन संघ ठरले आहेत. तर एका जागेसाठी पाच संघात चुरस आहे. असं असताना प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या तीन संघात टॉप 2 मध्ये जागा मिळवण्याचं आव्हान आहे. चला जाणून घेऊयात...

IPL 2026: आयपीएल गुणतालिकेतील टॉप 2 मध्ये कोणाला मिळणार संधी? दोन जागांसाठी तीन संघात चुरस
IPL 2026: आयपीएल गुणतालिकेतील टॉप 2 मध्ये कोणाला मिळणार संधीय़ दोन जागांसाठी तीन संघात चुरस
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 19, 2026 | 4:24 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील 63 सामन्यांचा खेळ संपला असून तीन संघांनी प्लेऑफमध्ये जागा पक्की केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांची प्लेऑफमधील जागा पक्की झाली आहे. आता एक जागा शिल्लक असून पाच संघांमध्ये रस्सीखेंच आहे. त्यामुळे पाच पैकी कोणता संघ टॉप 4 मध्ये जागा मिळवतो याची उत्सुकता आहे. दुसरीकडे, टॉप 3 मधील संघात टॉप 2 मध्ये जागा मिळवण्यासाठी चुरस आहे. त्यामुळे टॉप 2 लढाईही रंगतदार वळणावर आहे. विशेष म्हणजे या तिन्ही संघांनी 13 सामने खेळले आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 13 पैकी 9 सामन्यात विजय मिळवला आहे. 18 गुणांसह +1.065 नेट रनरेट आहे.

गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबादने 13 पैकी 8 सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघाचे 16 गुण आहेत. पण गुजरात टायटन्सचा नेट रनरेट हा सनरायझर्स हैदराबादपेक्षा चांगला आहे. त्यामुळे दुसर्‍या स्थानावर आहे. गुजरात टायटन्सचा नेट रनरेट हा +0.400 इतका आहे. तर सनरायझर्स हैदराबादचा नेट रनरेट हा +0.350 इतका आहे. म्हणजे दोन्ही संघात फक्त 0.050 चा फरक आहे. टॉप 2 मध्ये जागा मिळवण्याची संधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसह सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्सला देखील आहे.

कसं मिळेल टॉप 2 मध्ये स्थान

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 18 गुण आणि +1.065 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. आरसीबीचा शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आहे. त्यामुळे या दोन्ही संघासाठी टॉप 2 मध्ये जागा मिळवण्यासाठी विजय महत्त्वाचा आहे. आरसीबीने हा सामना जिंकला तर 20 गुणांसह टॉप 2 मध्ये जागा पक्की करेल. पण हैदराबादने हा सामना जिंकला तर दोघांचे 18 हे समान गुण होतील. नेट रनरेटच्या बाबतीत जो पुढे असेल त्याला टॉप 2 मध्ये जागा मिळेल. त्यामुळे या सामन्यात विजयासोबत नेट रनरेटची लढाई असेल.

गुजरात टायटन्सला टॉप 2 मध्ये जागा मिळू शकते. आरसीबीने सनरायझर्स हैदराबादला पराभूत केलं आणि गुजरात टायटन्सने सीएसकेविरुद्धचा शेवटचा सामना जिंकला तर टॉप 2 मध्ये जागा पक्की होईल. पण सनरायझर्स हैदराबादने सामना जिंकला तर काहीही करून गुजरातला शेवटचा सामना जिंकावा लागेल. इतकंच काय तर नेट रनरेटचं गणितात पुढे जावं लागेल. त्यामुळे नुसता विजय नाही तर नेट रनरेटचं गणित सोडवावं लागेल.

टॉप 2 स्थान का महत्त्वाची?

टॉप 2 मध्ये असेल्या संघांना अंतिम फेरी गाठण्याची दोन संधी मिळतात. क्वॉलिफायर 1 मध्ये टॉप 2 संघ एकमेकांविरुद्ध खेळतात. यात विजयी संघ थेट अंतिम फेरी गाठतो. तर पराभूत झालेला संघ एलिमिनेटर फेरीतील विजयी संघाशी क्वॉलिफायर 2 मध्ये लढत देतो. या सामन्यात विजय मिळाला तर अंतिम फेरीचं तिकीट मिळतं.

Follow Us