पाकिस्तानची हिरवी जर्सी गायब, खेळाडू गुलाबी रंगात मैदानात उतरले! इंग्लंडविरुद्ध अचानक रंग का बदलला? जाणून घ्या कारण
Pakistan Pink Jersey News: इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानी संघाने आपली ओळख बदलली. नेहमी हिरवी जर्सी घालणारा पाकिस्तानी संघ पहिल्यांदाच गुलाबी रंगात दिसला.

प्रत्येक क्रिकेट संघाची स्वतःची ओळख असते. ही ओळख केवळ नावापुरती किंवा खेळाडूंपुरती मर्यादित नसून, त्यात रंगाचाही समावेश असतो. रंग म्हणजे एकदिवसीय किंवा टी-२० क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरताना संघाने परिधान केलेल्या कपड्यांचा रंग. अनेक वर्षांपासून प्रत्येक क्रिकेट संघाची ओळख एका विशिष्ट रंगामुळेच राहिली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघ लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय तिरंगी मालिका सामना खेळत आहे. या सामन्यात पाकिस्तानी संघाने त्यांच्या पारंपरिक हिरव्या जर्सीऐवजी गुलाबी जर्सी परिधान केली आहे.
स्तनाच्या कर्करोगाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी आणि वेळेवर तपासणी करण्याचा संदेश देण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. जगभरात ऑक्टोबर महिना ‘स्तन कर्करोग जागरूकता महिना’ म्हणून साजरा केला जातो. याअंतर्गत पीसीबीने ‘पिंक रिबन ब्रेस्ट कॅन्सर ट्रस्ट हॉस्पिटल’च्या सहकार्याने ही मोहीम सुरू केली आहे. पाकिस्तानचे खेळाडू या सामन्यासाठी खास डिझाइन केलेल्या गुलाबी जर्सी परिधान करत आहेत. इंग्लंडचे खेळाडू, सामना अधिकारी आणि समालोचक गुलाबी रिबन लावून या मोहिमेला पाठिंबा देत आहेत.
सामन्यादरम्यान स्टंप्ससुद्धा गुलाबी रंगाचे आहेत. तर स्टेडियममधील स्क्रीन आणि बिलबोर्डवर स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृतीचे संदेश प्रदर्शित केले जात आहेत. पाकिस्तानी बोर्डाने ‘पिंक रिबन ब्रेस्ट कॅन्सर ट्रस्ट हॉस्पिटल’च्या भागीदारीत २४ ते २६ ऑक्टोबर दरम्यान चाहत्यांसाठी मोफत स्तन कर्करोग तपासणीचे आयोजनही केले आहे. पाकिस्तान व्यतिरिक्त, क्रिकेट दक्षिण आफ्रिका देखील गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशात ही मोहीम राबवत आहे, जिथे दरवर्षी एका एकदिवसीय किंवा टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ हिरव्या रंगाऐवजी गुलाबी जर्सी घालून खेळतो.
या त्रिकोणीय मालिकेत आतापर्यंत खेळलेले दोन्ही सामने पाकिस्तान संघाने जिंकले आहेत. पाकिस्तान आणि इंग्लंड व्यतिरिक्त श्रीलंकेचा संघही यात सहभागी झाला आहे. सलग तिसरा विजय नोंदवून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करण्याच्या इराद्याने पाकिस्तान संघात आला आहे. दुसरीकडे इंग्लंडला आपल्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
अंतिम फेरीत पोहोचण्याची आशा जिवंत ठेवण्यासाठी त्यांना विजयाची गरज आहे. मागील सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडचा ८७ धावांनी पराभव केला. इंग्लंडचाही श्रीलंकेविरुद्ध पराभव झाला. हॅरी ब्रुक्सच्या द्विशतकाच्या जोरावर इंग्लंडने ४२९ धावा केल्या. श्रीलंकेने एक चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले.