IND vs AUS : दुसऱ्या वनडे सामन्यात जसप्रीत बुमराह का खेळला नाही? बीसीसीआयने सांगितलं कारण

IND vs AUS 2nd ODI : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. या सामन्यात जसप्रीत बुमराह याला आराम देण्यात आला आहे.

IND vs AUS : दुसऱ्या वनडे सामन्यात जसप्रीत बुमराह का खेळला नाही? बीसीसीआयने सांगितलं कारण
IND vs AUS : जसप्रीत बुमराह याला दुसऱ्या वनडे सामन्यात आराम, बीसीसीआयने दिलं स्पष्टीकरण
Image Credit source: Twitter
| Updated on: Sep 24, 2023 | 5:01 PM

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या सामन्यात शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकी खेळीमुळे मजबूत स्थितीत आहे. पण दुसरीकडे, भारतीय गोलंदाजीचं प्रमुख अस्त्र असलेल्या जसप्रीत बुमराह याला आराम देण्यात आला आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धा जवळ असताना जसप्रीत बुमराह याला आराम का देण्यात आला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण वर्षभर जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर होता. त्यात आशिया कप स्पर्धेत नेपाळ विरुद्धच्या सामन्यात कौटुंबिक कारणामुळे खेळला नव्हता. आता पुन्हा एकदा आराम दिल्याने काही मोठं कारण तर नाही असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे. त्यावर आता बीसीसीआयने स्पष्टीकरण दिलं आहे.

जसप्रीत बुमराह याला नेमकं काय झालं?

जसप्रीत बुमराह संघासोबत इंदुरला आला नाही. याबाबत बीसीसीआयने ट्विटर माहिती देत सांगितलं की, “तो त्याच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेला आहे. संघ व्यवस्थापनानं त्याला शॉर्ट ब्रेक दिला आहे.” बुमराहच्या जागी मुकेश कुमार संघात आला आहे. मुकेश कुमार एशियन गेम्ससाठी चीनमध्ये जाणार आहे. तिसऱ्या वनडे सामन्यासाठी जसप्रीत बुमराह परत येईल अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. तिसरा वनडे सामना 27 सप्टेंबरला राजकोटमध्ये होणार आहे.

जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे गेलं वर्षभर संघाच्या बाहेर होता. त्यामुळे आशिया कप, टी20 वर्ल्डकप, आयपीएल 2023, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्याला मुकावं लागलं होतं. त्यानंतर आयर्लंड विरुद्धच्या मालिकेत कर्णधार म्हणून पुनरागमन केलं. त्यानंतर आशिया कप 2023 स्पर्धेत खेळला आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठीही निवड झाली आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराह याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रसिद्ध कृष्णा याला संधी मिळाली आहे. दुसरीकडे पॅट कमिन्सला आराम दिल्याने ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व स्टीव्ह स्मिथकडे देण्यात आलं आहे. या मागचं नेमकं कारण सांगण्यात आलेलं नाही.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस, ॲलेक्स कॅरी (W), कॅमेरॉन ग्रीन, सीन ॲबॉट, ॲडम झम्पा, जोश हेझलवूड, स्पेन्सर जॉन्सन

भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार/ विकेटकीपर), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा