
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना (Smriti Mandhana) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. संगीतकार पलाश मुच्छलसोबतचं तिचं लग्न पोस्टपोन झालं असून त्याने तिची फसवणूक केल्याच्या चर्चाही सुरू आहेत. स्मृती मानधना ही आघाडीची खेळाडू असून इन्स्टाग्रामवर तिचे 1 कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत. सध्या ती तिच्या लग्नामुळे चर्चेत असली, तरी आयुष्यात तिला कसा जोडीदार हवा, याबद्दल ती स्पष्टपणे बोलली होती. पलाशसोबत तिचं लग्न पोस्टपोन झाल्यावर स्मृतीचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काही वर्षांपूर्वी स्मृती ही ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये आली होती , तेव्हा ती अमिताभ बच्चन यांच्यासमोरच तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराबद्दल बोलली होती. या शोमध्ये स्मृती मंधानासोबत भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन देखील उपस्थित होता. आता तो जुना व्हिडीो पुन्हा चर्चेत आला आहे.
खरं तर, तेव्हा शोमधील प्रेक्षकांमधील एका तरुणाने स्मृती मानधनाला विचारले, “सोशल मीडियावर तुमचे खूप फॉलोअर्स आहेत. भारतातील अनेक तरुण तुम्हाला फॉलो करतात, म्हणून माझा तुम्हाला प्रश्न आहे की, तुम्हाला एका पुरूषात कोणते गुण आवडतात?” हा प्र्न ऐकताच बिग बी हे हसायला लागले. त्यांनी थेट त्या तरूणाला विचारलं की तुझं लग्न झालं आहे की नाही, तेव्हा तो तरूण म्हणाला, नाही ना सर.. म्हणून तर हा प्रश्न मी विचारतोय..
स्मृतीने दिलं खास उत्तर
तरूणाच तो सवाल ऐकून स्मृतीलाही हसू फुटलं. हसतच ती म्हणाली, ‘ मला या प्रश्नाची अपेक्षाच नव्हती, तरी सांगते. तो (जोडीदार) चांगला असावा हे सर्वांत महत्वाचं आहे. ’ त्यापुढे स्मृती काही बोलणार इतक्यात अमिताभ यांनी तिला विचारलं, चांगला असावा म्हणजे नक्की काय ?
केअरिंग आणि समजून घेणारा असावा जोडीदार
त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर देताना स्मृती म्हणाली, “मला वाटतं की त्याने काळजी घेतली पाहिजे आणि माझ्या खेळाला समजून घेतलं पाहिजे. या दोन महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यात असाव्यात अशी माझी इच्छा आहे, कारण एक मुलगी म्हणून मी त्याला जास्त वेळ देऊ शकणार नाही, म्हणून त्याने या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि नेहमी काळजी घेतली पाहिजे” असं स्मृतीने नमूद केलं. त्यावर बिग बी म्हणाल ‘ म्हणजे तिला असं म्हणायचं आहे की त्याने (जोडीदाराने) आदर करावा .’
स्मृतीचा हा जुना व्हिडीओ, तिच्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षाा, ते उत्तर पुन्हा चर्चेत आलं आहे. स्मृती आणि पलाशचं लग्न होणार का, ते कधी होणार असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांच्या मनात सध्या आहेत. दरम्यान लग्न पुढे ढकलण्यात आल्यावर स्मृती किंवा पलाश या दोघांतर्फेही अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.