Irfan Pathan : सिनियर्सना हटवा असं माझं म्हणणं नाहीय, पण..रोहित शर्मा फेल होताच इरफान पठाणची पटण्यासारखी रास्त मागणी
Irfan Pathan : न्यूझीलंड दौऱ्यात रोहित शर्मा अपयशी ठरला. चार सामन्यात ओपनिंगची संधी मिळाली. पण रोहित शर्माला प्रभाव पाडता आला नाही. तो फेल होताच माजी क्रिकेटपटू इरफान पठाण यांनी वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन एक मागणी केली आहे.

न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीजमध्ये रोहित शर्माच्या प्रदर्शनाकडे सगळ्यांच लक्ष होतं. पण रोहितने निराश केलं. रोहित शर्माने फक्त 30 धावा केल्या. पेस आणि स्विंग गोलंदाजीसमोर रोहित शर्मा हतबल दिसून आला. रोहितच्या अपयशावर इरफान पठाण एक महत्वाची गोष्ट बोलून गेला. “यशस्वी जैस्वालला वर्ल्ड कप आधी टेस्ट करण्याची गरज आहे. सिनियर्सना हटवा असं माझं म्हणणं नाहीय. पण त्यांना आराम देऊन यशस्वीला मैदानात उतरवा, जेणेकरुन वर्ल्ड कप आधी त्याला काही वनडे सामने खेळता येतील” असं इरफान पठाणने म्हटलय.
इरफान पठाणने स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात यशस्वीला संधी मिळाली पाहिजे असं मत मांडलं. “मी हे म्हणत नाहीय की, सिनियर्सना हटवा. पण जेव्हा तुम्हाला कुठल्या सिनियरला आराम द्यायचा असेल, तर यशस्वी जैस्वालला संधी मिळाली पाहिजे. हे त्याच्यासाठी आणि टीम इंडियासाठी चांगलं आहे. बॅकअप ओपनर म्हणून त्याला पुरेशा संधी मिळाल्या पाहिजेत. तिसरा ओपनर म्हणून संधी मिळाली पाहिजे. संधी मिळाल्यास यशस्वी सुद्धा तयार राहील” असं इरफान पठाणने म्हटलं.
स्ट्राइक रेट सुद्धा कमालीचा
वनडे क्रिकेट मध्ये यशस्वीचं प्रदर्शन चांगलं आहे. या डावखुऱ्या फलंदाजाला आतापर्यंत 6 वनडे सामन्यात संधी मिळाली आहे. त्यात त्याने दोन शतकाच्या मदतीने 285 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 71.25 आहे आणि स्ट्राइक रेट सुद्धा कमालीचा आहे. यशस्वीला आता पुन्हा कधी संधी मिळेल ते पहावं लागेल.
त्यांना मिडिल ऑर्डरमध्ये एक बॅकअप हवाय
फक्त यशस्वी जैस्वालचं नाही तर इशान किशनला सुद्धा टॉप ऑर्डर मध्ये संधी मिळाली पाहिजे असं इरफान पठाण यांना वाटतं. “इशानने लोअर ऑर्डरमध्ये चांगली फलंदाजी केली. तो एक डावखुरा फलंदाज आहे. लेफ्टी-रायटीच्या कॉम्बिनेशनमध्ये जिथे चेंडू वळतात, तिथे त्याने वरती फलंदाजी करावी. टीम मॅनेजमेंट काय करण्याचा प्रयत्न करतेय ते मला समजतय. त्यांना मिडिल ऑर्डरमध्ये एक बॅकअप हवा आहे” असं इरफान पठाण यांनी विश्लेषण केलं.