IND vs NZ: न्यूझीलंडने आधी मालिका गमावली अन् नंतर … किवीचं संकट काही कमी होईना, काय घडलं?
IND vs NZ T20 Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिका सुरु असून या मालिकेतील चौथ्या सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे.

IND vs NZ T20 Series: भारताविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथ्या सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. पहिले तीन सामने गमावल्यामुळे यजमान संघाने मालिका आधीच गमावली आहे. वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन आता मालिकेतून बाहेर झाला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी ऑकलंडमधील ईडन पार्क येथे खेळला जाणार आहे. या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत.
हॅगली ओव्हल येथे झालेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान लॉकी फर्ग्युसनला त्याच्या उजव्या पोटरीमध्ये वेदना जाणवल्या. स्कॅनमध्ये स्नायूला ताण आल्याचे उघड झाले. न्यूझीलंड क्रिकेटने लॉकीबद्दल माहिती देताना सांगितले की, मैदानावर परतण्यापूर्वी त्याला बरे होण्यासाठी अंदाजे आणखी एक आठवडा लागू शकतो. शेवटच्या दोन टी-२० सामन्यांसाठी संघात मॅट फिशरचा समावेश करण्यात आला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिका ४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. न्यूझीलंड संघाला आशा आहे की लॉकी त्या मालिकेपूर्वी तंदुरुस्त होईल. दरम्यान, वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीला दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान त्याच्या उजव्या मांडीत वेदना जाणवल्या आणि त्याची पुढील तपासणी करण्यात आली. त्याला किरकोळ दुखापत झाली असून, ती बरी होण्यासाठी एक ते दोन आठवडे लागतील. हेन्रीला टी-२० मालिकेतून आधीच बाहेर करण्यात आले आहे.
३५ वर्षीय वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळला. त्याने प्रत्येक सामन्यात तीन षटके गोलंदाजी केली आणि अनुक्रमे ३४ व ३७ धावा दिल्या. या काळात त्याने केवळ एक बळी घेतला. दोन्ही सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने विजय मिळवला. लॉकी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात खेळला नाही आणि त्या सामन्यात भारताने १४ व्या षटकात १९९ धावांचे लक्ष्य पूर्ण केले. यामुळे टी-२० मालिका गमावणे हे एक मात्र दु:ख किवी संघाला नसेल तर आता लॉकी फर्ग्युसन सारख्या गोलंदाजाला दुखापत होणं ही देखील समस्या आहे.