महाराष्ट्रातील युवा फुटबॉलपटू दर्शन पाटीलचं नशिब चमकलं, स्वप्नपूर्तीसाठी मिळालं आंतरराष्ट्रीय व्यासपीठ

| Updated on: Feb 23, 2024 | 7:19 PM

महाराष्ट्रातीय युवा फुटबॉलपटू दर्शन पाटील याचं नशिब चमकलं आहे. दर्शनने आपल्या खेळाने सर्वांची मनं जिंकली होती. अखेर त्याच्या मेहनतीचं चीज झालं. त्याची निवड एस.व्ही. ग्मुंडेनसाठी आणि युरोपियन लीगसाठी झाली आहे. त्याचबरोबर नेदरलँडचा अनिवासी भारतीय वर्मन यालाही संधी मिळाली आहे.

महाराष्ट्रातील युवा फुटबॉलपटू दर्शन पाटीलचं नशिब चमकलं, स्वप्नपूर्तीसाठी मिळालं आंतरराष्ट्रीय व्यासपीठ
महाराष्ट्रातून दोन युवा फुटबॉलपटूंचं नशिब चमकलं, स्वप्नपूर्तीसाठी मिळालं आंतरराष्ट्रीय व्यासपीठ
Follow us on

मुंबई : फुटबॉलसाठी गेल्या काही दिवसांपासून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. आता त्याला कुठे यश मिळताना दिसत आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील 19 वर्षीय फुटबॉलपटू दर्शन पाटील याला ऐतिहासिक संधी मिळाली आहे. SV Gmunden या क्लबसाठी खेळणारा आणि युरोपियन लीगमध्ये सामील होणारा पहिला महाराष्ट्रीयन खेळाडू म्हणून ओळखला जाणार आहे. त्याच्यासोबत, नेदरलँड्समधील अनिवासी भारतीय वर्मन यालाही क्लबकडून खेळण्याची संधी देण्यात आली आहे. SV Gmunden क्लबचे अध्यक्ष गेरहाल्ड रिडल यांनी दर्शन पाटील आणि वर्मन या दोघांना संघाची जर्सी देत क्लबमध्ये समाविष्ट करून घेतलं. फुटबॉल क्लब सध्या ऑस्ट्रियन आणि लँडेसलिगामध्ये खेळतो. या कार्यक्रमासाठी SV Gmunden क्लब अध्यक्ष गेरहाल्ड रिडल, कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पी.व्ही. शेट्टी, कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनचे मानद सचिव श्री जया शेट्टी, आरआयईएसपीओचे वरिष्ठ सल्लागार कौशिक मौलिक आणि PRO10 चे संचालक राजेश मालदे उपस्थित होते.

SV Gmunden चे क्लबचे अध्यक्ष गेरहाल्ड रिडल यांनी युवा खेळाडूंची स्तुती करताना सांगितलं की, “दोन्ही मुले प्रतिभावान आहेत. आमच्यासोबत आल्याचा आज आम्हाला आनंद होत आहे. भारतात प्रचंड प्रतिभासंचय आहे आणि RIESPO सारखे प्लॅटफॉर्म आम्हाला या खेळाडूंना ओळखण्यात मदत करतात. भारताकडे असलेली खरी क्षमता जगाला दाखवण्याची गरज आहे.”

या कार्यक्रमादरम्यान भारतीय फुटबॉलसाठी आणखी एक अभूतपूर्व पाऊल पडलं आहे. PRO10 द्वारे व्यवस्थापित मुंबई, महाराष्ट्रात युरोपियन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यासाठी कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशन आणि ऑलिव्हर कान अकादमी यांच्यातील सहकार्याची घोषणा करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल आणि भारतातील प्रतिभेला प्रोत्साहन देण्याचा यामागे उद्देश आहे. महाराष्ट्रात युरोपियन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करून फुटबॉलपटूंना जागतिक दर्जाचे कोचिंग आणि सुविधा या माध्यमातून दिल्या जाणार आहेत.

कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनचे (KSA) अध्यक्ष पी. व्ही शेट्टी सांगितलं की, “भारतात फुटबॉलची पायाभरणी करण्यासाठी केएसए आणि ओलिवर कान अकादमीत सहकार्याची गरज आहे. त्यामुळे भारतातील प्रतिभावान फुटबॉलपटूंना खऱ्या अर्थाने व्यासपीठ मिळेल. युरोपियन ट्रेनिंग कार्यक्रमांमुळे भारतीय फुटबॉलपटूंना खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय दर्जाचं फुटबॉल कळेल.”

दक्षिण-पूर्व आशिया आणि आरआयईएसपीओचे वरिष्ठ सल्लागार कौशिक मौलिक यांनी सांगितलं की, “मला विश्वास आहे की फुटबॉल खेळामध्ये भारतीयांमध्ये क्षमता आहे. आम्हाला अशी प्रतिभा शोधून त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचे आहे. RIESPO हेच करण्याचा प्रयत्न करत आहे. दोन्ही मुलांची चांगली कामगिरी पाहून मला खूप आनंद झाला आहे.”

युवा फुटबॉलपटू दर्शन पाटील म्हणाला, “हा क्षण माझ्यासाठी स्वप्नपूर्तीसारखा आहे. माझ्या देशाचे आणि ज्या क्लबने मला निवडले त्याचे प्रतिनिधित्व करताना मला खूप अभिमान वाटतो. मी माझ्या देशासाठी आणि क्लबसाठी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन.”

या कार्यक्रमात बोलताना वर्मन या भारतीय वंशाच्या डच खेळाडूने सांगितलं की, “अशी संधी मिळाल्याचा मला अभिमान वाटतो. हे माझ्यासाठी एक स्वप्न होते. मी यापुढे आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन आणि क्लबसाठी माझे सर्व काही देईन.”