Prithvi Shaw : 6 महिन्यांपूर्वी साखरपुडा, आता अचानक मोडलं पृथ्वी शॉचं लग्न, आकृतीची इमोशनल पोस्ट
भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांच्या नात्याला पूर्णविराम मिळाला आहे. आकृतीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत नातं तुटल्याचं जाहीर केलं. भविष्यकालीन उद्दिष्टे वेगळी असल्याने हा निर्णय घेतल्याचं तिने म्हटलं. सहा महिन्यांपूर्वीच त्यांचा साखरपुडा झाला होता.

भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर गेल्या बऱ्याच काळापासून उलटसुलट चर्चा सुरू होत्या. आता आकृतीने सोशल मीडियावर पोस्ट करत नातं तुटल्याचं जाहीर केलं आहे. आकृती अग्रवालने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक इमोशनल पोस्ट लिहीत नातं तुटल्याचं लिहीलं. त्या दोघांचं नातं तुटल्याने मोठी खळबळ माजली असून चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.
काय म्हणाली आकृती ?
‘ अत्यंत जड अंतःकरणाने मला हे सांगायचं आहे की, मी आणि माझ्या होणाऱ्या पतीने (फियांसे) वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्याबाबतची आमची उद्दिष्टं वेगळी असल्याने आम्ही आता एकत्र नाहीयोत. परिस्थितीमुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. आमच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर आहे, तरीही आम्ही एकमेकांसाठी योग्य नाही आहोत असं आम्हाला वाटतं. आमच्या सध्याच्या जबाबदाऱ्या आणि परिस्थितीचा विचार करून आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.’ असं आकृतीने तिच्या पोस्टमध्ये नमूद केलंय.
आमच्या प्रायव्हसीचा आदर राखा
पुढे आकृतीने लिहिलं, ‘आमच्या दोघांच्याही शांततेसाठी आणि आनंदासाठी मी मनापासून प्रार्थना करते. आमचे मार्ग आता वेगळे झाले असून आम्ही आता पुढे जात आहोत’ असं तिने पुढे म्हटलं. ‘ या कठीण काळात आमच्या प्रायव्हसीचा आदर राखा, अशी मी सर्वांना विनंती करते. कृपया आमच्या निर्णयाबाबत तर्क-वितर्क व्यक्त करू नका किंवा खोट्या कथा रचू नका. समजून घेतल्याबद्दल आणि आदर केल्याबद्दल धन्यवाद.’ असंही तिने पुढे आपल्या पोस्टमध्ये लिहीलं.
View this post on Instagram
पृथ्वी शॉशी असलेलं नातं लग्नापूर्वीच संपल्याचं आकृतीने आपल्या पोस्टमधून स्पष्ट केलं. आम्ही दोघं आता एकत्र नाही, असंही तिने नमूद केलं.
6 महिन्यात तुटलं नातं
पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांचा या वर्षी 8 मार्च रोजी मोठ्या थाटामाटात साखरपुडा झाला. साखरपुड्यानंतर ही जोडी परदेशात ट्रीपलाही गेली होती. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये एकमेकांसोबत ते खूप आनंदी दिसले. मात्र, काही दिवसांपूर्वी पृथ्वी हा आकृतीची फसवणूक करत असल्याच्या बातम्या समोर आल्या. आकृतीने या अफवा फेटाळून लावल्या; तरी तिने या काळात अनेक क्रिप्टीक पोस्ट्स शेअर केल्या होत्या. मात्र या पोस्ट्सचा आपल्या नात्याशी काहीही संबंध नसल्याचे तिने स्पष्ट केलं होतं. दुसरीकडे, पृथ्वीने या सर्व आरोपांबाबत मौन बाळगलं. आजही त्याने आकृतीच्या या घोषणेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
