Sunil Gavaskar : रोहित शर्मा जबरदस्त खेळला, विंडिज विरुद्ध 92 धावा केल्या तरी सुनील गावस्कर त्याच्यावर निराश, म्हणतात की..
Sunil Gavaskar : प्रसिद्ध समालोचक सुनील गावस्कर हे परखड विश्लेषणासाठी ओळखले जातात. रोहित शर्माने वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे सीरीजमध्ये जबरदस्त प्रदर्शन केलय. सुनील गावस्कर यांनी रोहितच्या खेळीचं विश्लेषण केलय.

टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा दिवसेंदिवस संघातील आपलं स्थान बळकट करत चालला आहे. काही महिन्यांपूर्वी लॉर्ड्सवर रोहित शर्मा शेवटचा वनडे सामना खेळणार अशी चर्चा होती. हेड कोच गौतम गंभीर आणि चीफ सिलेक्टर अजित आगरकर रोहित शर्माचा पर्याय म्हणून यशस्वी जैस्वालचा 2027 वनडे वर्ल्ड कपसाठी विचार करतायत असं चित्र दिसत होतं. पण रोहित शर्माने आपल्या बॅटिंगने सगळ्यांचीच तोंड बंद केली आहेत. इंग्लंड विरुद्ध मालिकेतील शेवटच्या वनडेमध्ये त्याने खणखणीत शतक झळकवलं. त्यानंतर वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे सीरीजमध्ये रोहितने 101 आणि 92 धावा केल्या. रोहित शर्माला आता 2027 वनडे वर्ल्ड कपच्या टीममध्ये पर्याय नाही हे स्पष्ट झालय. रोहितचा परफॉर्मन्सचा असा आहे की, तो आता टीममध्ये हवाच.
आता पुढच्या काही वनडे सीरीजमध्ये रोहित शर्माचं प्रदर्शन कसं असेल त्यावर सर्वांच लक्ष असेल. त्यात न्यूझीलंड विरुद्ध पाच वनडे सामन्यांची मालिका आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे मालिकेत त्याने शतक झळकवलं. पण त्याहीपेक्षा तिसऱ्या वनडेत विडिंज विरुद्ध केलेल्या 92 धावा जास्त महत्वाच्या आहेत. कारण या सामन्यात टीम इंडियाची सुरुवात खराब झालेली. गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिळत होती. अशावेळी रोहितने दमदार फलंदाजी केली. रोहितने सुरुवातीला संभाळून फलंदाजी केली. तो 36 वनं शतक झळकवणार असं वाटलं होतं. पण नव्वदीत तो आऊट झाला.
त्याचे चाहते निराश झाले
रोहितने ज्या 92 धावा केल्या त्या महत्वाच्या होत्या. त्यासाठी त्याचं कौतुकही झालं. पण रोहितचं शतक हुकलं. त्यामुळे त्याचे चाहते निराश झाले. यात लिटिल मास्टर सुनील गावस्कर सुद्धा आहेत. रोहितचं आंतरराष्ट्रीय करिअर संपेल, तेव्हा त्याच्या नावावर त्याच्या वयापेक्षा जास्त शतकं असावीत अशी सुनील गावस्कर यांची इच्छा आहे.
सुनील गावस्कर काय म्हणाले?
“मी निराश झालो कारण रोहित 92 धावांवर आऊट झाला. त्याला त्याचं शतक पूर्ण करता आलं नाही. वनडे वर्ल्ड कप 2027 नंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतो. रोहित जेव्हा निवृत्ती घेईल, त्या दिवशी त्याच्या खात्यावर वयापेक्षा जास्त सेंच्युरीची नोंद असावी अशी माझी इच्छा आहे” असं सुनील गावस्कर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कशी बोलताना म्हणाले. “विंडिज विरुद्ध त्याने शतक झळकवलं असतं तर ती त्याची 36 वी सेंच्युरी ठरली असती. निवृ्त्तीच्यावेळी खेळाडूच्या वयापेक्षा त्याच्या नावावर सेंच्युरी जास्त असतील तर ती एक खास बाब ठरते. त्यातून त्या प्लेयरच करिअर कसं होतं ते दिसून येतं” असं सुनील गावस्कर म्हणाले. रोहित पुढच्यावर्षी 40 वर्षांचा होईल. सध्या त्याच्या नावावर 35 शतकं आहेत.
