Vinod Kambli: त्याला उभंही राहाता येत नव्हतं; विनोद कांबळी गंभीर आजाराच्या विळख्यात, केअर सेंटरकडून मोठं विधान
Vinod Kambli Video Viral: विनोद कांबळी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात त्यांची अवस्था बिकट असल्याचे समोर आले आहे. आता ज्या केअर सेंटरमध्ये ते उपचार घेत आहे, त्यांचा संस्थापकांनी हेल्थवर अपडेट दिली आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी एका व्हिडिओमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. विनोद कांबळींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. या व्हिडिओ ते एका वृद्धाश्रमात दिसत आहे. विनोद कांबळी या व्हिडिओमध्ये वृद्धाश्रमाचे कौतुक करताना दिसले. पण कांबळीची अशी अवस्था पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. विनोद कांबळींवर नेमके काय उपचार सुरु आहेत याबद्दल माहिती जाणून घ्या…
विनोद कांबळी ‘निदान द मुक्ती’ या वृद्धाश्रमात सध्या आहे. विनोद कांबळी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या NGOचे संस्थापक महेश नाईक यांनी कांबळी यांच्या तब्येतीवर अपडेट दिली आहे. कांबळी आमच्यासाठी ‘हिरो’ आहे आणि त्यांना हवं तितके दिवस पूर्णपणे मोफत तिथे राहता येईल.”
ETV भारतशी बोलताना नाईक म्हणाले, “विनोद कांबळी गेल्याच वर्षी आमच्या संस्थेत दाखल झाला आणि जवळपास पाच ते सहा महिने इथे राहिला. आम्ही त्याला फिजिओथेरपी आणि इतर आवश्यक असलेले सर्व उपचार दिले. तो जेव्हा पहिल्यांदा इथे आला, तेव्हा त्याच्याकडे साधं उभं राहण्याइतकीही ताकद नव्हती. मात्र, उपचारांना त्याने खूप चांगला प्रतिसाद दिला आणि आता तो बऱ्यापैकी बरा आहे.”
महेश नाईक पुढे म्हणाले, “यावेळी जेव्हा तो पुन्हा इथे परतला तेव्हाही आम्ही त्याला आवश्यक फिजिओथेरपी दिली. त्याला डायबिटीसचाही त्रास आहे. रक्तातील साखरेची पातळी जास्त असल्यामुळे उपचार करताना आम्हाला योग्य ती काळजी घ्यावी लागते. आता त्याची बायको त्याला घरी घेऊन गेली आहे.”
नाईक यांनी पुढे सांगितलं, “जेव्हा तो आमच्यासोबत इथे असतो, तेव्हा तो नेहमीच आनंदी आणि उत्साही असतो. ज्या आकृती हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते, त्यांनीच त्याला आमच्याकडे पाठवून दिले. “विनोद कांबळी आमच्यासाठी एक हिरो आहे. त्याला आयुष्यभरात जेव्हा कधी आमच्याकडे राहावंस वाटेल, तेव्हा तो हवे तितके दिवस इथे राहू शकतो आणि तेही मोफत. त्याच्या उपचारांचा खर्च आम्हीच उचलू. आमच्या हिरोप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची जर आम्हाला संधी मिळत असेल, तर ती आम्ही आनंदाने करु.”
