Virat Kohli: एक दिवस सगळं संपणार त्यामुळे यात अडकणं म्हणजे…15,000 धावा केल्यानंतरही विराट जे म्हणाला ते ऐकून तुम्हीही व्हाल शॉक
Virat Kohli After Century: विराट कोहलीने कालच्या सामन्यात दणदणीत शतक झळकावले आणि भारतीय संघाला विजय मिळवून दिला, आता यानंतर विराट कोहलीने एक विधान केले ज्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

IND vs WI ODI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहलीच्या बॅटने शानदार कामगिरी केली. त्याने संघासाठी अवघ्या ८८ चेंडूंमध्ये १३९ धावांचे नाबाद शतक झळकावले. यादरम्यान, त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद १५,००० धावा करण्याचा अनोखा विक्रमही प्रस्थापित केला. सामन्यानंतर, विराटने त्याच्या या विक्रमाबद्दल एक विधान केले आहे.
विराट म्हणाला, “खरं सांगायचं तर, मी वैयक्तिक विक्रमांवर कधीच लक्ष केंद्रित करत नाही. माझे लक्ष नेहमी सामन्याची परिस्थिती समजून घेणे आणि संघासाठी माझे काम करण्यावर असते. यश आपोआपच मिळते. इतका काळ खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि देवाचा आभारी आहे. मी फक्त माझे काम करत राहतो आणि आयुष्यात इतक्या संधी दिल्याबद्दल देवाचे आभार मानतो. आम्ही खूप भाग्यवान आहोत कारण जगातील अनेक लोक या पातळीवर पोहोचण्याची आकांक्षा बाळगतात. आम्ही त्या निवडक लोकांपैकी आहोत ज्यांना ही संधी मिळाली आहे. त्यामुळे, आपण दररोज पूर्ण प्रामाणिकपणाने आणि कठोर परिश्रमाने काम केले पाहिजे.”
तो म्हणाला, “खरं सांगायचं तर, मी खूप आनंदी आहे. कधीकधी आपण मागे वळून पाहिलं पाहिजे की आपण कोण होतो आणि कुठून आलो आहोत. अनेकदा, आपण जगाच्या झगमगाटात, प्रसिद्धीत आणि लोकांच्या नजरेत इतके गुंतून जातो की आपण आपली सुरुवात विसरून जातो. भारतीय संघासोबत मैदानावर घालवलेल्या प्रत्येक क्षणाचा मी आनंद घेत आहे. तरुण खेळाडूंना संदेश देताना कोहली म्हणाला, “हे एक असं वास्तव आहे ज्याचा सामना करायला खेळाडूंना आवडत नाही. एक दिवस, सगळं काही संपणार आहे. त्यामुळे, जोपर्यंत तुम्ही खेळत आहात, तोपर्यंत तुम्हाला जसं खेळायचं आहे तसं खेळा उगाच नको त्या गोष्टींमध्ये अडकू नका. माझा त्यांना सल्ला आहे की, मैदानाबाहेरील गोष्टींचा जास्त विचार करू नका. जेव्हा तुम्ही मैदानावर पाऊल ठेवता, तेव्हा तेच तुमचं संपूर्ण जग असलं पाहिजे.”
तो म्हणाला, “तुमच्या शरीराला पूर्ण ताकदीने झोकून द्या. १५० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना एका षटकात चार वेळा दुहेरी धाव घेण्यासाठी धावावे लागले तरी चालेल. कोणतीही सबब चालणार नाही. तुम्ही या मानसिकतेने खेळलात तर सर्व काही ठीक होईल. या खेळीमुळे मला खूप स्पष्टता मिळाली आहे. विश्वचषकाला अजून एक वर्ष बाकी आहे. माझे ध्येय काय आहे हे मला माहीत आहे. आता मिळणाऱ्या सामन्यांमध्ये मला माझ्या खेळाच्या विविध पैलूंवर काम करायचे आहे. मला स्वतःला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवायचे आहे आणि स्वतःला आव्हान द्यायचे आहे.”
