
प्राण्यांनाही माणसांसारखंच प्रेम आणि काळजी लागते. ज्याप्रमाणे पालक आपल्या मुलांची काळजी घेतात, त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यांचीही काळजी घेतली तर त्यांनाही तितकाच जीव लावला जातो. जगात असेही अनेक जण आहेत जे आपल्या पाळीव प्राण्यांना अगदी लेकरासारखं वाढवतात. सोशल मीडियावर सध्या असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ लाखो लोकांच्या मनाला भिडला आहे. या व्हिडीओत एक महिला मांजराला अगदी लहान मूल असल्यासारखं तोंडात अन्न भरवताना दिसते. हे दृश्य खरंच पाहण्यासारखं आहे.
काय आहे व्हिडीओ?
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, महिला किती प्रेमाने आपल्या मांजरीला अन्न भरवत आहे आणि मांजरही अगदी आरामात बसून मजेत खातेय. यात मांजरही लहान मुलांसारखीच खाताना नाटक करते, पण महिला हळूच तोंडात अन्न कोंबते. लहान मुलांना खायला घालतानाही अगदी असंच करावं लागतं. तेही खाण्यात आढेवेढे घेतात, पण आई मात्र जबरदस्तीने भरवूनच सोडते. मांजराच्या गळ्यात एक सुंदर नेकलेसही आहे आणि महिला जितका जीव लावून तिला खायला घालते, त्यावरून लक्षात येतं की ही पाळीव मांजर तिच्यासाठी किती मौल्यवान आहे.
व्हिडीओला १.२ कोटींहून जास्त व्ह्यूज
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा आकर्षक व्हिडीओ इंस्टाग्रामवर @nithya.thecat या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत त्याला 1.2 कोटींहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. 7 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले असून विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
सध्या सोशल मीडियावर मांजरीच्या या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. काहींनी चिंता व्यक्त करत “पाळीव मांजरीला जबरदस्तीने तोंडात अन्न भरवू नका. यामुळे Aspiration Pneumonia होऊ शकतो, ज्याने प्राणही जाऊ शकतात. दिसायला गोड वाटतं पण धोकादायक असू शकतं” असे म्हटले आहे. तर काहींनी हसत हसत लिहिलं, “भारतीय आई अशाच असतात… जोपर्यंत लेकराला तोंडात कोंबून खायला घालत नाही, तोपर्यंत शांत बसत नाहीत!”