नाश्ता करता करताच मरू लागले नवरे… बायकांनीच एकामागून एक 300 नवऱ्यांना… काय होतं त्या गावचं गूढ?
नागीरेव, हंगेरी येथील 'एंजल मेकर्स'ची धक्कादायक कथा: सुमारे 100 वर्षांपूर्वी गावातील महिलांनी आपल्या दारुड्या, अत्याचारी पती आणि नातेवाईकांना विष देऊन संपवले. 1911 ते 1929 दरम्यान 300 पुरुषांचा मृत्यू झाला. समाजात स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि त्यांना मिळालेला भयानक न्याय त्यामुळेच ही घटना घडल्याचं सांगितलं जातं.

तब्बल 100 वर्षापूर्वीपर्यंत महिलांना अबला, कमजोर आणि सहनशील समजलं जायचं. ही मानसिकता केवळ भारतातच नव्हती तर जगभरात अनेक ठिकाणी हीच मानसिकता होती. स्त्रीयांना दुय्यमच समजलं जात होतं. नवरा, भाऊ, आणि वडिलांना तर स्त्रीवर अन्याय करण्याचं जणू सामाजिक लायसन्स मिळालं होतं. अगदी बालवयातच मुलींचं लग्न लावून दिलं जात होतं. कधी कधी तर अल्पवयीन मुलींचं लग्न म्हाताऱ्या व्यक्तीशी लावून दिलं जात होतं. कारण महिलांना गुलाम समजलं जात होतं. दारूडा, म्हातारा आणि आजारी नवरा तर तिला नेहमीच मारहाण करायचा. महिलांवर बलात्कार केला जायचा. जगभरात हेच सुरू होतं. पण त्याच काळात म्हणजे 100 वर्षापूर्वी हंगरीतील एका गावातील महिलांनी संपूर्ण चित्रच बदलून टाकलं होतं.
सुमारे 100 वर्षापूर्वी हंगरीतील एक छोटं गाव नागीरेवमध्ये असंच काही घडत होतं. त्यामुळे संपूर्ण जगातील पुरुषसत्ताक समाजाला हादरवून सोडलं. 1911 ते 1029 दरम्यान या गावातील महिलांनी सुमारे 300 पुरुषांना विष देऊन मारून टाकलं होतं. जगाने या महिलांना ‘एंजेल मेकर्स ऑफ नागीरेव’ म्हटलं. पण या महिला खरोखरच जन्मजात मारेकरी होत्या का? की अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या पहिल्या क्रांतिकारी महिला होत्या? हा सवाल आहे.
गावात एक आया आली आणि…
ही कहाणी सुरू होते 1911मध्ये. बुडापेस्टच्या 130 किलोमीटर अंतरावर दक्षिणेला नागीरेव गाव आहे. सुमारे 1500 लोकसंख्येचं हे गाव. गावातले सर्वच शेतकरी. या गावात ना डॉक्टर होते, ना पोलीस. 1911मध्ये या गावात जुजसन्ना फजकास नावाची एक आया आली. जुसन्नाचा नवराही रहस्यमरित्या गायब झालेला होता. लवकरच ती गावातील महिलांची डॉक्टर, सल्लागार आणि विश्वासू बनली. गावातील महिला जुजसन्नाकडे आपल्या वेदना घेऊन जायच्या. एकूण सर्वच महिलांच्या वेदना सारख्याच होत्या. यातना एकच होत्या. नवरा दारू पितो. मारहाण करतो. बलात्कार करतो. जुगारात सर्व पैसे उडवतो, अशा या तक्रारी होत्या. त्याकाळातील महिलांना नवऱ्यांपासून घटस्फोट घेणं अशक्य अशी गोष्ट होती. 14-15 वर्षाच्या मुलींचं लग्न वयस्क लोकांशी केलं जायचं. पहिल्या महायुद्धातून परतलेले पुरुष तर अधिकच हिंसक झाले होते.
अन् एक एक करून…
जुजसन्ना फजकासने गावातील महिलांना एक सोपा उपाय सांगितला. तिने थेट नवऱ्याला विष देण्यास सांगितलं. असं विष की ज्यामुळे आजाराने मृत्यू झाल्याचं दिसून येईल. विष दिल्याचा कुणालाच संशय येणार नाही. त्यानंतर जे झालं ते धक्कादायक होतं. इतिहासात नोंदवलं गेलं. नवरे नाश्ता करता करताच मरू लागले. दारूचा ग्लास तोंडाला लावताच आयुष्य संपू लागलं. केवळ नवराच नव्हे, तर हिंसक बाप, अत्याचारी सासरा आणि धोका देणारे प्रेमीही या विळख्यात सापडले.
300 पुरुष गायब, तिघींना फाशी
1911 ते 1929 पर्यंतच्या या 10 वर्षात या गावातील सुमारे 300 पुरुष गायब झाले. पोलीस ठाण्यात नवरे हरवल्याच्या तक्रारी वाढू लागल्या. 4 डिसेंबर 1929 रोजी अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्समध्ये हंगरीच्या या प्रकरणाची बातमी छापली होती. त्यामुळे जगाला धक्का बसला होता. या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी चौकशी सुरू केली. 1929 पर्यंत पोलिसांनी 43 हिलांना पकडलं. 28 महिलांवर तर 100 हून अधिक हत्यांचा गुन्हा दाखल करण्यात आला. कबरी खोदल्या गेल्या. 92 टक्के मृतदेहांमध्ये विष आढळून आलं. याप्रकरणात 6 महिलांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली गेली. तीन महिलांना फाशी झाली. 8 महिलांना जन्मठेप झाली. फजकासने पकडल्यावर स्वत: विष घेऊन जीव दिला. दरम्यान, गावात एकामागून एक मृत्यू होत होते. 18 वर्ष या घटना घडत होत्या. पण एकाही पुरुषाला त्याचा संशय आला नव्हता.
