Viral Video : मेलेल्या नदीला केलं जिवंत, पण लोकांनी पुन्हा कचरा टाकला; बिट्टू तबाही पुन्हा उतरला पाण्यात
बिट्टू तबाही अर्थात सुरेंद्र सिंह चौधरी याने आठ महिने मेहनत करून अजनार नदी स्वच्छ केली होती. मात्र, नदीत पुन्हा कचरा साचल्याचं दिसताच त्याने नाराजी व्यक्त करत पुन्हा स्वच्छता मोहीम सुरू केली. त्याचा व्हिडिओ बिट्टूने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

काही दिवसांपुर्वीच सोशल मीडियावर एका अस्वच्छ नदीला स्वच्छ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. बिट्टु तबाही या मुलाने मेलेल्या नदीला जीवनदान दिले होते. ही नदी स्वच्छ करण्यासाठी त्याने कोणतीही सरकारी मदत घेतली नव्हती. स्वत: तब्बल 8 महिने मेहनत करून ती नदी स्वच्छ केली होती.
पण आता त्याच नदीची ही अवस्था पाहून बिट्टूला अश्रू अनावर झाले आहेत. आठ महिने मेहनत करून स्वच्छ केलेली अजनार नदी पुन्हा कचऱ्याने भरली आहे . यासंबंधीत व्हिडिओ शेअर करून त्याने नाराजी व्यक्त तर केलीच आहे पण पुन्हा नदी स्वच्छ करण्यासाठी गडी पाण्यात उतरलाय.
बिट्टू तबाहीच खरं नाव सुरेंद्र सिंह चौधरी आहे. मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील बियावरा परिसरात वाहणाऱ्या अजनार नदीची अवस्था पाहून त्याने स्वच्छता मोहिम हाती घेतली होती. नदीला जीवनदान दिलं होतं. पण नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नदीत पुन्हा कचरा जमा होऊ लागला आहे असे त्याने सांगितले आणि दाखवलेही.
पाण्यात प्लॅस्टिकच्या पिशव्या,फुलं आणि इतर बराच कचरा तरंगताना दिसतोय. नदीच्या काठावरही कचऱ्याचा ढीग पाहायला मिळतोय.पण बिट्टूने नदीची ही अवस्था पाहून काम सोडून दिलेलं नाही. यावेळी त्याने लोकांच्या मदतीने कचरा साफ करण्याचे ठरवले आहे. नदीतला जास्तीत जास्त कचरा कसा काढता येईल, पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून काय करता येईल याबाबत विचार आणि काम करण्याचे ठरवले आहे.
बिट्टूचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याच्या मेहनतीचं, जिद्दीचं कौतुक केलं आहे. तर काही लोकांनी कचरा नदीत टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर काहींनी स्थानिक प्रशासनानेही याकडे लक्ष द्यावं असं म्हटलं आहे. कारण नदी स्वच्छ करणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ती स्वच्छ कशी राहिल याची काळजी करणंही महत्त्वाचं आहे.