VIDEO : घरकाम मी करेन, बायकोने फक्त पैसे कमावावे; तरुणाच्या अटींवर नेटकऱ्यांमध्ये चर्चा, त्या गोष्टीने सर्वच भडकले
सध्या सोशल मीडियावर लग्नासाठी मुलगी हवी म्हणून एक अजब गजब पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे त्याचे प्रचंड कौतुक होत असून त्याला कमावणारी बायको हवी आहे आणि घर तो स्वत: सांभाळणार आहे. या पोस्टमुळे चर्चेला उधाण आले आहे.

लग्नासाठी आतापर्यंत मुली अटी शर्ती ठेवतात हे ऐकलं होतं. पण आता एका मुलाने लग्नासाठी मुली समोर अटी ठेवल्या आहेत. पण या अटी काही साध्या सुद्या नाही बरं का! त्याला कशी बायको हवी याची चक्क त्याने सोशल मीडियावर पोस्टच केली आहे. त्यानुसार या तरूणाला वर्षाला किमान 12 लाख कमावणारी बायको हवी आहे विशेष म्हणज पत्नीने नोकरी करून घराची आर्थिक जबाबदारी सांभाळावी, घर तो मुलगा स्वत: सांभाळणार, मुलंही नको, अशी त्याने अट ठेवली आहे.
पत्नी कमावणार मी घर सांभाळणार
हा संपूर्ण प्रकार रेडिटवरील एका पोस्टमधून समोर आला आहे. घराची मुख्य कमावती व्यक्ती होऊ इच्छिणाऱ्या पत्नीच्या शोधात आहे. अशा आशयाने या तरूणाने पोस्ट शेअर केली आहे. त्याला अशी महिला हवी आहे जिला स्वत:च्या आवडीचं करिअर, व्यवसाय किंवा नोकरी करायची आहे. ती कुठेही काम करू शकते आणि आपल्या व्यावसायिक आयुष्यात पुढे जाऊ शकते. दुसरीकड,घराची संपूर्ण जबाबदारी तो स्वत: घेण्यास तयार आहे.
स्वयंपाक करणं, घराची स्वच्छता ठेवणं, कपडे धुणं आणि घरातील इतर काम करण्याची आपली तयारी असल्याचं त्याने पोस्टमध्ये सांगितलं आहे. पती- पत्नीमध्ये प्रेम, आदर आणि समानता असावी.असंही त्यांच म्हणणं आहे. पत्नी बाहेर जाऊन कमावते आणि पती घर सांभाळतो यात काहीच चुकीचं नाही अशी भूमिका त्याने मांडली आहे.
लग्नानंतर मुलं नकोत, स्पष्ट केली इच्छा
या तरूणाने केवळ नोकरी आणि घरकामाबद्दल अटी ठेवल्या नाहीत, तर लग्नानंतर मुलं होऊ नयेत, अशी इच्छाही व्यक्त केली. त्याला चाईल्ड फ्रि लग्न हवं आहे. भारतात अशा विचारांची महिला आहे का? असा प्रश्नही त्याने विचारला आहे.अशा प्रकारच्या लग्नासाठी महिलांनी त्वरित संपर्क साधावा असं त्याने म्हटलं आहे.
काहींनी पाठिंबा दिला तर काहींनी विचारले प्रश्न
या पोस्टनंतर रेडिटवर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काहींनी तरूणाच्या निर्णयाचं समर्थन केलं.महिलांनी वर्षानुवर्षे घर आणि नोकरी अशा जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत, तर पुरूषाने सांभाळण्यात गैर काय. असा सवाल काही यूजर्सनी उपस्थित केला आहे. मात्र काही यूजर्सनी त्याच्या अपेक्षांवर प्रश्न उपस्थित केलं. केवळ घरात राहण्याची इच्छा असून चालणार नाही. तर घराचं बजेट, खर्चाचं नियोजन आणि भविष्यासाठी बचत यांची जबाबदारीही घ्यावी लागेल, असं काहींनी म्हटलं आहे. तर काहींनी ही पोस्ट गंभीर नसून केवळ लक्ष वेधण्यासाठी केलेली असू शकते. अशी शंका व्यक्त केली आहे.