AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! तुकाराम मुंढेंविरोधात तब्बल 29 कर्मचाऱ्यांचा एल्गार; थेट मंत्र्यांकडे घेतली धाव

मोठी बातमी! तुकाराम मुंढेंविरोधात तब्बल 29 कर्मचाऱ्यांचा एल्गार; थेट मंत्र्यांकडे घेतली धाव

| Updated on: Jul 30, 2026 | 10:37 AM
Share

राज्यात अन्न भेसळविरोधी कारवायांमुळे चर्चेत असलेले अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेतील 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीविरोधात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

15 जुलै रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनात कर्मचाऱ्यांनी प्रयोगशाळेतील कामकाजाबाबत अनेक गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. अचानक दोन शिफ्टमध्ये काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सकाळी 9 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत काम करावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही काम करण्याचे आदेश दिल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, दोन शिफ्टची कार्यपद्धती सुरू करताना आवश्यक मनुष्यबळ, तांत्रिक सुविधा आणि संसाधने उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असून, त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

याशिवाय, अन्न, औषध आणि सौंदर्यप्रसाधनांचे प्रलंबित नमुने लवकर निकाली काढण्यासाठी विश्लेषकांवर अतिरिक्त दबाव टाकला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. एका विश्लेषकाकडून ठरावीक मर्यादेपेक्षा अधिक नमुने तपासण्यास भाग पाडले जात असल्याने विश्लेषणाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या निवेदनावर प्रयोगशाळेतील 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून त्यांनी शासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्याही मांडल्या आहेत. यामध्ये शासन निर्णयानुसार पूर्वीची कार्यालयीन वेळ लागू करणे, दोन शिफ्टची कार्यपद्धती तात्काळ रद्द करणे, शनिवार-रविवारच्या शासकीय सुट्ट्यांचा लाभ देणे तसेच रिक्त पदे भरून आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या तक्रारीमुळे अन्न व औषध प्रशासन विभागातील अंतर्गत कामकाज आणि व्यवस्थापनाबाबत नवा वाद निर्माण झाला असून, याप्रकरणी शासन आणि संबंधित विभागाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 30, 2026 10:37 AM

Follow Us