डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, आरोपीला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी त्याला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती देण्यात आली आहे. ऑगस्ट २०१३ मध्ये दाभोलकर यांची हत्या झाली होती. या प्रकरणात सहआरोपी शरद कळसकरला एप्रिलमध्येच जामीन मिळाला होता. आता दाभोलकर कुटुंबाची पुढील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यासोबतच, अंदुरेला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.
ऑगस्ट २०१३ मध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण देशभरात चर्चेत होते. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. या प्रकरणातील सहआरोपी शरद कळसकर याला यापूर्वीच एप्रिल महिन्यात जामीन मिळाला होता. सचिन अंदुरे हा दाभोलकर यांच्या हत्येतील कथित मुख्य नेमबाज (शूटर) म्हणून ओळखला जातो. त्याला जामीन मिळाल्याने दाभोलकर कुटुंबीय आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

