Dragon Fruit: कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी बेस्ट पर्याय, ड्रॅगन फ्रुट करणार मालामाल, कमी पाण्यात शाश्वत उत्पन्नाचा नवा पर्याय
Dragon Fruit Farming: दुष्काळावर मात करण्यासाठी शेतकरी विविध प्रयोग करत आहेत. भाजीपाल्यापासून तर फळपीकांपर्यंत प्रयोग करण्याचे धाडस शेतकरी दाखवत आहेत. काही शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रुटचा पर्याय स्वीकारला आहे.

Dragon Fruit Farming: घटलेली भूजल पातळी, दुष्काळाचे संकट यामुळे कोरडवाहून पट्ट्यातील शेतकरी आता पारंपारिक शेतीसोबतच नवनव प्रयोग करून पाहत आहेत. त्यातून आर्थिक गणित जुळवण्याची धडपड सुरू आहे. कमी पाण्यात आणि प्रतिकूल हवामानातही तग धरून राहणारे ड्रॅगन फ्रुट हे पीक दुष्काळी आणि कोरडवाहू शेतीसाठी एक नवीन आणि आशादायी पर्याय ठरू शकतो. काही शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे. एखादा लागवड केल्यावर पुढे काही वर्षे फळं लागत असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होतो.
कमी पाण्यात ड्रॅगन फ्रुटची शेती
ड्रॅगन फ्रुट हे प्रामुख्याने कॅक्टस् म्हणजे निवडुंग वर्गातील पीक असल्याने त्याला अत्यंत कमी पाणी लागते. कोरडवाहू आणि कमी पावसाच्या पट्ट्यातही हे पीक येते. पारंपारिक पिकांच्या तुलनेत ड्रॅगन फ्रुटला कमी पाणी लागते. पाणी टंचाईच्या काळात, उष्ण आणि दमट वातावरणातही हे पीक तग धरते. त्याची क्षमता चांगली राहते. ठिबक सिंचनाची जोड मिळाल्यास उत्पादनात अजून भर पडते.
लागवडीची पद्धत
ड्रॅगन फ्रुटसाठी पाण्याचा निचरा होणारी हलकी ते मध्यम प्रतिची जमीन चांगली मानली जाते. जमिनीचा पीएच 5.5 ते 7.0 दरम्यान असावा. काळ्या कसदार आणि पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत मुळे कुजत नाहीत. त्यामुळे ड्रॅगन फ्रुट जमिनीत गादीवाफे तयार करून लागवड करावी.
हे वेलवर्गीय पीक असल्याने त्याला आधाराची गरज असते. साधारणपणे 10-12 फूट बाय 7-8 फूट अंतरावर 6-7 फूट उंचीचे सिमेंट खांब रोवावे. खांबाच्या वरील बाजूला गोल रिंग अथवा जुने टायर बसवावे. त्यावरून फांद्या या छत्रीसारख्या खाली येतात. पेरणीपूर्वी खड्यात शेणखत, गांडूळ खत आणि ट्रायकोरर्मा मिसळावे.
लागवाडीचा कालावधी
ड्रॅगन फ्रुटची लागवड वर्षभरात कोणत्याही काळात करता येते. त्यासाठी एकच विशिष्ट हंगाम महत्त्वाचा नसतो. पण जून ते सप्टेंबर आणि फेब्रुवारी ते मार्च हा कालावधी या फळपिकासाठी योग्य मानल्या जातो. पण अतिउष्ण अशा मे महिन्यात या फळाची लागवड करणे टाळावे. पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवड केल्यास नैसर्गिक ओलाव्याचा फायदा होतो. सिंचन व्यवस्था असेल तर फायदा होतो. ठिबक सिंचनमुळे उत्पादन वाढीसह खर्चही वाचतो.