
नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील तळोदा शहरात (Taloda City) लग्नाचे जेवण सुरू असताना अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मंडपात जेवण करणाऱ्या लोकांची चांगलीचं धांदल उडाली. लग्नाचे आणि जेवणाचे मोठे नुकसान झाले आहे. गारपीट व अवकाळी पावसाचे थैमान अधिक असल्यामुळे लग्नासाठी आलेल्या पै-पाहुण्यांना डोक्यावर खुर्ची घेऊन घरी जाण्याची वेळ आल्याचं चित्र पाहायला मिळालं. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात बारगड गढी परिसर व माळी समाज मंगल कार्यालयात गारपीट झाल्याने परिसरात गारवा निर्माण झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर नंदुरबार तळोद्या तालुक्यात अवकाळी पाऊस (unseasonal rain) जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
हवामान विभागाने सांगितल्यानुसार आज पासून वातावरणात बदल झाल्याने द्राक्षाची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पावसाचे बारीक बारीक थेंब येत असल्या कारणामुळे हातातोंडाशी आलेला घास वाया जातोय का ? अशी भीती द्राक्ष उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे निफाड तालुक्यातील पश्चिम भागातील सायखेडा चांदोरी सह परिसरातील गावांना फटका बसला. आता पुन्हा अवकाळी पावसामुळे चाळीस ते पन्नास रुपये किलो मिळणारा बाजार भाव उत्पादन खर्च निघणार नसल्याचं शेतकरी सांगत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 16 ते 17 मार्च या कालावधीत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ग्रामीण कृषी मौसम सेवा,उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेकडून वर्तविण्यात आली आहे.या कालावधीत ताशी 30 ते 40 किमी वेगाचा सोसाट्याचा वारा व मेघगर्जना ही होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मेघगर्जनेसह पावसाची शक्यता मुख्यत्वेकरून जिल्ह्याच्या पूर्वेकडील सह्याद्री घाट माथ्याकडून सुरवात होत अंतर्गत भागातही प्रभाव असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे सद्यस्थितीत उष्म्यात मोठया प्रमाणात वाढ झालेली असल्याने अगोदरच अडचणीत सापडलेला शेतकरी आणखीन अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदयाला मातीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदयाला 3 ते 4 रुपये किलो भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. कांदा लागवडसाठी लाखो रुपयांचा खर्च लावून देखील कांदयाला मातीमोल भाव मिळत असल्याने आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.