देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कारवर मोठी सूट, किंमत 5.29 लाख अन् मायलेज 27 किमी

देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कारवर मिळतेय 39500 रुपयांपर्यंत सूट. 27 किमी मायलेज अन् किंमत फक्त 5.29 लाख रुपये. किती दिवस आहे ऑफर?

देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कारवर मोठी सूट, किंमत 5.29 लाख अन् मायलेज 27 किमी
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 04, 2026 | 6:20 PM

मारुती सुझुकी इंडियाची ईको ही देशातील सर्वात स्वस्त 7-सीटर कार म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे, ही देशातील सर्वात स्वस्त 7-सीटर CNG कारदेखील आहे. नोव्हेंबर महिन्यात कंपनी या कारच्या खरेदीवर ग्राहकांना तब्बल 39,500 रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे. यामध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट बेनिफिट्सचा समावेश आहे.

मारुती ईकोच्या पेट्रोल व्हेरिएंटची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.29 लाख रुपये आहे. तर CNG व्हेरिएंटसाठी ग्राहकांना 6.46 लाख रुपये मोजावे लागतात. ही कार 5, 6 आणि 7 सीटच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

Loading...

पेट्रोल मॉडेलवर सर्वाधिक कॅश डिस्काउंट

नोव्हेंबरमध्ये कंपनी पेट्रोल व्हेरिएंटवर 22 हजार रुपयांची कॅश सूट देत आहे. तर CNG व्हेरिएंटवर 10 हजार रुपयांची कॅश सूट मिळत आहे. याशिवाय जुन्या कारच्या एक्सचेंजवर 10 हजार ते 15 हजार रुपयांपर्यंत बोनस दिला जात आहे. हा बोनस एक्सचेंजसाठी दिल्या जाणाऱ्या कारच्या स्थितीवर अवलंबून असेल. तसेच 2500 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट बेनिफिट्सही उपलब्ध आहेत. या सर्व ऑफर्स मिळून ग्राहकांना 39500 रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो.

इंजिन आणि मायलेज किती?

मारुती ईकोमध्ये K-Series 1.2 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. पेट्रोलवर हे इंजिन 80.76 PS पॉवर आणि 104.5 Nm टॉर्क निर्माण करते. तर CNG मोडमध्ये 71.65 PS पॉवर आणि 95 Nm टॉर्क मिळतो.

कंपनीच्या दाव्यानुसार, ईकोच्या टूर व्हेरिएंटचे मायलेज पेट्रोलमध्ये 20.2 किमी प्रतिलिटर, तर CNG मध्ये 27.05 किमी प्रतिकिलो आहे. पॅसेंजर व्हेरिएंटमध्ये पेट्रोलचे मायलेज 19.7 किमी प्रतिलिटर आणि CNG चे 26.78 किमी प्रतिकिलो आहे.

5,7 सीटपासून अ‍ॅम्ब्युलन्सपर्यंत पर्याय

ईकोमध्ये 5-सीटर, 7-सीटर, कार्गो, टूर आणि अ‍ॅम्ब्युलन्स अशा विविध प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. या कारची लांबी 3675 मिमी, रुंदी 1475 मिमी आणि उंची 1825 मिमी आहे. अ‍ॅम्ब्युलन्स व्हर्जनची उंची 1930 मिमी आहे.

व्हॅन प्रकारातील रचना असल्यामुळे ईकोचा वापर शाळांच्या व्हॅन, रुग्णालये तसेच व्यावसायिक प्रवासी वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.

खरेदीपूर्वी ऑफर्सची खात्री करा

ईकोवर मिळणारी 39500 रुपयांपर्यंतची सूट शहर, डीलर आणि उपलब्ध ऑफर्सनुसार बदलू शकते. त्यामुळे कार खरेदी करण्यापूर्वी जवळच्या डीलरकडून कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि इतर लाभांची सविस्तर माहिती घेणे महत्त्वाचे आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us