खिशात 3000… 19 व्या वर्षी उभं केलं 500000000 रुपयांचे साम्राज्य, जेन झी पिढीतल्या युवा उद्योजकाची तुफान चर्चा

Ansh Patidar : मध्य प्रदेशातील एका छोट्याशा आदिवासी जिल्ह्यातील मुलाने अवघ्या 19 व्या वर्षी 50 कोटी रुपयांचे साम्राज्य उभे केले आहे. त्याच्या यशाची कहाणी जाणून घेऊयात.

खिशात 3000... 19 व्या वर्षी उभं केलं 500000000 रुपयांचे साम्राज्य, जेन झी पिढीतल्या युवा उद्योजकाची तुफान चर्चा
Ansh Patidar Success Story
Image Credit source: Google
| Updated on: Jul 26, 2026 | 10:23 PM

वयाच्या 19 व्या वर्षी एखाद्या तरूणाकडे किती संपत्ती असते? आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाचे उत्तर असेल की 19 व्या वर्षी तरूण शिक्षणावर लक्ष देतात, त्यामुळे त्यांच्याकडे सअर्जित संपत्ती असण्याचा प्रश्नच नाही. मध्य प्रदेशातील एका छोट्याशा आदिवासी जिल्ह्यातील मुलाने अवघ्या 19 व्या वर्षी 50 कोटी रुपयांचे साम्राज्य उभे केले आहे. ज्या वयात अनेक तरुण कॉलेजला जात असतात त्या वयात या तरुणाने स्वतःला जवळपास 95 लाख रुपयांच्या कर्जातून बाहेर काढले आणि हजारो शेतकऱ्यांचे आयुष्य बदलून टाकले. आज आपण अंश पाटीदार यांची प्रेरणादायी कहाणी जाणून घेणार आहोत.

वडिलांचा संघर्ष आणि डोळ्यांतील स्वप्न

अंश पाटीदार हे मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील बोरला या गावचे रहिवासी आहेत. रोजगाराच्या मर्यादित संधी असलेल्या या भागात शेती आणि मजुरी हेच प्रमुख उत्पन्नाचे स्रोत आहेत. अंश यांचे कुटुंब पिढ्यानपिढ्या शेती करत आले आहे. त्यांचे वडील दिवसरात्र कष्ट करून शेती सांभाळत असत. दहावीमध्ये अंश यांना 91 टक्के गुण मिळाले. इंजिनिअर होण्याचे आणि इंदूरमध्ये जाऊन शिक्षण घेण्याचे अंश यांचे स्वप्न होते. मात्र शेती तोट्यात गेल्यामुळे त्यांच्या वडिलांवर मोठे कर्ज होते. त्यामुळे आईने दागिने विकून त्यांचे शिक्षण चालू ठेवण्याची तयारी दाखविली.

एका कल्पनेने बदलले आयुष्य

अंश यांनी ठरवले की आईचे दागिने विकू दिले नाहीत. त्यांनी गावात राहूनच काहीतरी मोठं करण्याचा निर्णय घेतला. उन्हाळ्याच्या सुट्टीत ते वडिलांसोबत शेतात काम करू लागले. एके दिवशी ते कीटकनाशक खरेदी करण्यासाठी दुकानात गेले. तिथे त्यांनी एकाच रासायनिक घटकाची दोन औषधे होती. एक ब्रँडेड आणि दुसरे स्थानिक. दोन्हींची गुणवत्ता सारखी असतानाही किमतीत मोठा फरक होता. अंश यांनी इंटरनेटवर माहिती जाणून घेतली असता मध्यस्थांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूट होत आहे असं लक्षात आले.

अंश यांच्या मनात कल्पना आली की, कंपनीकडून थेट माल आणून तो शेतकऱ्यांना कमी किमतीत का विकू नये? त्यावेळी त्यांच्याकडे फक्त 3,000 रुपये होती. त्यांनी गुजरातमधील एका उत्पादकाशी संपर्क साधला आणि थोड्या प्रमाणात माल मागवला. पहिला ग्राहक त्यांचा शेजारी मित्र ठरला. चार दिवसांनी त्या मित्राच्या वडिलांनी औषधाचे कौतुक केले आणि अंश यांचा आत्मविश्वास वाढला.

छोट्या सुरुवातीपासून मोठ्या यशाकडे

2019 मध्ये, वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी, अंश पाटीदार हे इतक्या कमी वयात GST नोंदणी मिळवणारे भारतातील पहिले व्यक्ती ठरले. ते दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर ते रात्री 9 वाजेपर्यंत सायकलवरून गावोगावी फिरून शेतकऱ्यांना कीटकनाशकांचे प्रात्यक्षिक दाखवत असत. त्यानंतर रात्री 1 वाजेपर्यंत अभ्यास करत असत. त्यांना या मेहनतीचे फळ मिळाले आणि केवळ दीड वर्षांत त्यांच्या व्यवसायाची उलाढाल 40 लाख रुपयांपर्यंत पोहोचली.

चांगल्या सुरुवातीनंतर 95 लाखांचे कर्ज

यशाच्या या प्रवासात अंश यांना अचानक मोठा अडथळा आला. इंदूरमधील एका स्टार्टअप कार्यक्रमानंतर अंश यांना तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यांनी AgroStand नावाचा प्लॅटफॉर्म सुरू केला. मात्र अनुभवाचा अभाव आणि बाजारातील अडचणींमुळे वयाच्या 17 व्या वर्षी हे स्टार्टअप अपयशी ठरले. या अपयशामुळे अंश यांच्यावर 95 लाख रुपयांचे कर्ज झाले. त्यांना सर्व काही संपल्यासारखे वाटत होते.

राखेतून पुन्हा उभे राहिले

डोक्यावर मोठे कर्ज झाले तरी अंश यांनी हार मानली नाही. तेविश्वासू शेतकरी आणि विक्रेत्यांकडे गेले आणि त्यांच्यासमोर संपूर्ण सत्य मांडले. ते म्हणाले, तुम्ही मला थोडे आगाऊ पैसे द्या. त्याबदल्यात मी तुम्हाला अतिरिक्त सवलत देईन. लोकांनी एका 17 वर्षांच्या मुलाच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवत 95 लाख रुपयांचा धोका पत्करला. त्या पैशातून अंश यांनी सर्व कर्ज फेडले आणि पुन्हा नव्याने सुरुवात केली.

50 कोटींचे साम्राज्य

कर्जाच्या संकटातून बाहेर पडताच अंश यांनी 2022 मध्ये ‘Ariva Organics’ या कंपनीची स्थापना केली. त्यांनी शेतकऱ्यांना बायो-पेस्टिसाइड्स आणि ड्रोन तंत्रज्ञानाशी जोडले. 2023 पर्यंत त्यांच्या कंपनीची उलाढाल कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचली आणि कंपनीचे मूल्यांकन 50 कोटी रुपयांहून अधिक झाले. आज अंश यांच्या कंपनीने 15,000 एकर क्षेत्रातील 5,000 हून अधिक शेतकऱ्यांना मोफत ड्रोन सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us