
Gautam Adani | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी भारतात, आशियातच नाही तर जागतिक पातळीवर डंका वाजवला आहे. जगातील सर्वात श्रीमंतांच्या टॉप 10 यादीत त्यांनी स्थान पटकावलं आहे. असे स्थान मिळवणारे ते पहिले भारतीय तर ठरलेच आहे, पण पहिले आशियाई व्यक्ती सुद्धा ठरले आहेत. या यादीत दूर दूरपर्यंत इतर विकसीत राष्ट्रांची नावे नाहीत. अदानी समुहाचे मालक आणि उद्योगपती गौतम अदानी यांनी जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. श्रीमंतांच्या यादीत टॉप 3 मध्ये त्यांनी स्थान मिळवलं आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार (Bloomberg billionaires index), अदानीची एकूण संपत्ती $137 अब्ज, म्हणजेच दुसऱ्या शब्दात 10.90 लाख कोटींवर पोहोचली आहे. श्रीमंतांच्या या यादीत टेस्लाचे एलॉन मस्क (Elon Musk) आणि जेफ बेझोस (Jeff Bezos) हेच श्रीमंत त्यांच्या पुढे आहेत. पण या यादीतून भारताचे मोठे उद्योगपती आणि रिलायन्स उद्योगसमुहाचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे बाहेर फेकल्या गेले आहेत. अदानी हे भारतीय उद्योगातील लंबे रेस का घोडा ठरले आहेत.
या वर्षात, 2022 मध्ये जगातील बहुतांश श्रीमंतांची संपत्ती कमी अधिक प्रमाणात वाढली आहे. तर इतरांच्या तुलनेत गौतम अदानी यांनी बक्कळ कमाई केली आहे. त्याआधारेच त्यांनी टॉप 10 मध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे. त्यांची एकूण संपत्ती 2022 मध्ये सुमारे $61 अब्ज म्हणजेच सुमारे 4.88 लाख कोटींनी वाढली आहे. टॉप 10 श्रीमंतांमध्ये अदानी हे एकमेव उद्योगपती आहे, ज्यांची संपत्ती यावर्षात सुपरफास्ट वाढली आहे. पण असे भाग्य इतर उद्योगपतींच्या वाट्याला आले नाही. त्यांचे यंदा नुकसान झाले आहे.
या टॉप 10 यादीतील इतर गर्भश्रीमंत अर्थातच अमेरिकेतील आहेत. तर एक श्रींमत फ्रांन्स देशातील आहे. एलन मस्क यांनी 25,100 कोटी डॉलरसह पहिले स्थान अबाधित ठेवले आहे. तर जेफ बेझोस यांनी 15,300 कोटी डॉलरसह दुसरे स्थान पटकावले आहे. चौथ्या स्थानावर फ्रान्समधील बर्नार्ड अर्नॉल्ट यांनी झेप घेतली आहे. त्यांची एकूण संपत्ती 13600 कोटी डॉलर आहे. इतर श्रीमंत अमेरिकेतील आहेत.
| नाव | संपत्ती |
|---|---|
| एलन मस्क, अमेरिका | 25,100 कोटी डॉलर |
| जेफ बेझोस,अमेरिका | 15,300 कोटी डॉलर |
| गौतम अदानी, भारत | 13700 कोटी डॉलर |
| बर्नार्ड अनॉंल्ट, फ्रांस | 13600 कोटी डॉलर |
| बिल गेट्स, अमेरिका | 11700 कोटी डॉलर |
| वॉरेन बफे, अमेरिका | 10000 कोटी डॉलर |
| लॅरी पेज, अमेरिका | 10000 कोटी डॉलर |
| सर्जी बिन, अमेरिका | 9580 कोटी डॉलर |
| स्टीव्ह बाल्मर, अमेरिका | 9370 कोटी डॉलर |
| लॅरी एलिसन, अमेरिका | 9330 कोटी डॉलर |
रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा, भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना या जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत स्थान पटकावता आले नाही. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 9190 कोटी डॉलर म्हणजे सुमारे 7.35 लाख कोटी इतकी आहे. या वर्षी त्यांची संपत्ती 196 कोटी डॉलर्स म्हणजेच सुमारे 1.57 लाख कोटींनी वाढली आहे.