Gold Reserves: जगात सर्वाधिक सोनं कोणत्या देशाकडं? चीनने रशियाला पछाडले, भारत यादीत कुठे?
Gold Reserves Top 10 Country: सोन्याच्या किंमती गगनाला भिडलेल्या असल्या तरी अनेक देशांची सोने खरेदी थांबलेली नाही. भारतातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्याच्या आयातीवरून नागरिकांना मोठे आवाहन केले आहे. कोणत्या देशाकडे आहे सर्वाधिक सोने?

Gold Reserves Top 10 Country: जगात केवळ दोनच ठिकाणी युद्ध चाललेले नाही तर अनेक ठिकाणी सीमेवर संघर्ष उडालेला आहे. राजकीय तणाव आणि आर्थिक मंदीची भीतीने अनेक सरकार चिंताग्रस्त आहेत. या परिस्थितीशी सामना करण्यासाठी अनेक केंद्रीय बँका, मध्यवर्ती बँका या सोन्याचा साठा करत आहेत. सोने खरेदी करत आहेत. सोने आयात करत आहेत. जागतिक आर्थिक सुधारणा आणि संशोधन संस्था द कोबेसी लेटरच्या ( The Kobesissi Letter) आकडेवारीनुसार, अमेरिकेकडे जगात सर्वाधिक सोने आहे. चीन सुद्धा या स्पर्धेत धावत आहे. त्याने रशियाला पिछाडीवर टाकले आहे.
कोणत्या देशाकडे किती सोने?
द कोबेसी लेटरनुसार, अमेरिकेकडे एकूण 8 हजार 133 टन सोने आहे. तर जर्मनी जगात 3,351 टन सोन्यासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत सध्या संघर्षात होरपळत असलेला इटली तिसऱ्या क्रमांकावर, फ्रान्स चौथ्या स्थानी, तर पाचव्या क्रमांकावर चीन आहे. यापूर्वी चीन हा रशियाच्या मागे होता. चीनने मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले. चीन लवकरच टॉप 3 मध्ये येण्याची शक्यता आहे. हा डेटा सप्टेंबर 2026 पर्यंतचा आहे.
या अहवालानुसार, वर्ष 2026 च्या तिसऱ्या तिमाहीत जुलै ते सप्टेंबर या कालावधीत डिजिटल गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली. म्हणजे गुंतवणूकदारांनी ऑनलाईन सोने खरेदी केली. भौतिक सोन्यातील खरेदीपेक्षा डिजिटल सोन्यातील गुंतवणूक वाढत आहे. एखाद्या आर्थिक वर्षात डिजिटल सोन्यात गुंतवणूक वाढण्याचा हा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. म्हणजे जगात अजूनही सोन्याचे गारूड कमी झालेले नाही, हे समोर येत आहे. तर चीन जगात सर्वाधिक सोने खरेदी करत असल्याचे समोर आले आहे. यामुळे सोन्याचा भाव अजून वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त होत आहे.
या यादीत भारत आठव्या क्रमांकावर
या अहवालानुसार, भारत या सोने साठवणुकीत आठव्या क्रमांकावर आहे. रशियाकडे 2,305 टन सोन्याचा साठा आहे. हा देश सहाव्या क्रमांकावर आहे. 1,040 टन सोन्यासह स्वित्झर्लंड सातव्या क्रमांकावर आहे. तर या क्रमवारीत 881 टन सोन्यासह भारत जगात आठव्या क्रमांकावर आहे. 846 टन सोन्यासह जपान नवव्या तर 613 टन सोन्यासह नेदरलँड हा दहाव्या क्रमांकावर आहे.
