
पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा Zomato, Swiggy Instamart, Zepto किंवा Blinkit सारख्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुन सामान ऑर्डर कराल आणि तुमची डिलिव्हरी १० मिनिटांत दारात येण्याची आशा बाळगाल तर ती वाया जाईल..कारण केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर आता या कंपन्यांनी १० मिनिटांत डिलिव्हरीच्या दाव्याची जाहिरात देणे बंद केले आहे.त्यामुळे या बदलास सरवण्यासाठी आता ग्राहकांना थोडा वेळ लागणार आहे.परंतू याचा खूप मोठा फटका क्विक कॉमर्स कंपन्यांच्या व्यवसायावरही पडणार आहे. गेल्या चार वर्षात क्विक कॉमर्स मार्केटमध्ये २३७२ टक्क्यांहून जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे दरवर्षी नवीन कंपन्या या क्षेत्रात प्रवेश करत आहेत.
भारताचा क्विक कॉमर्सचा बाजार वेगाने वाढत आहे. साल २०२२ मध्ये क्विक कॉमर्सचा GMV (ग्रॉस मर्चेंडाईझ व्हॅल्यू) सुमारे २,७०० कोटी रुपये होता, तो आता हजारो कोटींपर्यंत पोहचला आहे. म्हणजे गेल्या ४ वर्षांत २,३०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.लोक दैनंदिन जीवनात छोट्या मोठ्या वस्तूंसाठी या प्लॅटफॉर्म्सवर विश्वास ठेवत आहेत. ऑनलाईन ग्रोसरीत क्विक कॉमर्सचा हिस्सा सुमारे ७० टक्के आहे. आणि एकूण ई- रिटेल खर्चाच्या सुमारे १० टक्के यातूनच मिळतो.
सामान्य दिवसात या प्लॅटफॉर्म्सवर ३० ते ५० लाख ऑर्डर येतात. पिक टाईम वा सणांच्या स्पेशल दिवसांत ही संख्या आणखीन वाढते. उदाहरण ३१ डिसेंबर २०२५ रोजी सुमारे ७५ लाख ऑर्डर आल्या होत्या. सरासरी ऑर्डर व्हॅल्यू ५०० ते ७०० रुपयांदरम्यान असते. ज्यामुळे त्यावेळी एकाच दिवशी ३७५ कोटींहून अधिक व्यवसाय झाला होता.
वेगवान डिलिव्हरीसाठी कंपन्या शहरात डार्क स्टोर्स ( मायक्रो-वेअरहाऊस ) तयार करतात. हे केवळ ऑनलाईन ऑर्डर पूर्ण करण्यासाठी असतात. येथे ग्राहक थेट खरेदी करु शकत नाहीत. देशभरात असे २,५०० ते १,३०० डार्क स्टोर्स आहेत. जे सर्वसामान्यपणे घरांपासून ४०० मीटर ते २ किलोमीटर अंतरात असतात. Blinkit स्वत:चे सुमारे १,३०० स्टोर्स आहेत. अंदाज असा आहे की साल २०३० पर्यंत ही संख्या ७,५०० पर्यंत जाऊ शकते.
वेगवान वाढ असूनही अनेक कंपन्या अजूनही तोट्यात चालू आहे. कारण या कंपन्या इन्फ्रास्ट्रक्चर, कस्टमर एक्विजिशन आणि एक्सपेंशनवर मोठी गुंतवणूक करीत आहेत. आर्थिक वर्षे २०२४-२५ मध्ये Zepto ला १,२४९ कोटी रुपये, Blinkit ला १५८ कोटी रुपये आणि Swiggy Instamart ला ८४० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. भविष्यातील वाढ आणि प्रॉफिटेबिलिटी दरम्यान संतुलन करणे यांना आव्हानात्कक ठरणार आहे.
डार्क स्टोअर्सची चांगली जागा आणि रायडरची सरासरी वेग ( १६ किमी प्रति तास ) मुळेच १० मिनिटांत डिलिव्हरी शक्य होते असे Zomato CEO दीपिंदर गोयल यांनी म्हटले आहे. आमचे डिलिव्हरी पार्टनर्स दर तासाला सरासरी १०२ रुपये कमावतात असा दावा कंपन्या करत आहेत. ती अन्य नोकरीच्या तुलनेत स्पर्धक कमाई आहे. गिग कामगार संघटनांचे म्हणणे आहे की कंपन्या १० मिनिटांत डिलिव्हरीच्या नावाने शोषण करत आहेत. सरासरी १२ ते १४ तास काम करुनही अनेक कामगार २५ हजारांहून कमी कमाई करत आहेत. त्यांना किमान वेतन, निश्चित कामाचे तास, ओव्हरटाईम आणि सामाजिक सुरक्षेची गरज असल्याचे कामगार संघटनांचे म्हणणे आहे.