‘TATA ग्रुपवर कब्जा करायचा आहे…’: रतन टाटांच्या भावाचे नोएल टाटांवर गंभीर आरोप; टाटांच्या भावकीत मोठा वाद
TATA Group Controversy: दीर्घकाळ मौन बाळगल्यानंतर, रतन टाटांचे धाकटे भाऊ जिमी एन. टाटा यांनी टाटा ट्रस्टमध्ये नोएल टाटांच्या कुटुंबाचा वाढता प्रभाव यावरून गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट्स यांच्यात वाद सुरु आहेत. या वादाला आता एक नवीन वळण आले आहे. दीर्घकाळ मौन बाळगल्यानंतर, रतन टाटा यांचे धाकटे बंधू जिमी एन. टाटा यांनी टाटा ट्रस्ट्समध्ये नोएल टाटा यांच्या कुटुंबाचा वाढता प्रभाव यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. जिमी टाटा यांनी नोएल टाटा यांच्या कुटुंबाच्या वाढत्या प्रभावाला ‘मागच्या दाराने’ टाटा सन्सवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. यासह जिमी टाटा यांनी टाटा सन्स चे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. थोडक्यात सांगायचे तर, जिमी टाटा आता उघडपणे नोएल टाटा यांच्या विरोधात उभे राहिले आहेत. नेमकं प्रकरण जाणून घ्या.
नोएल टाटा यांच्या कुटुंबाबाबत उपस्थित केले प्रश्न
‘फायनान्शिअल एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, जिमी टाटा हे अनेक वर्ष टाटा ट्रस्टच्या मिटिंग आणि सार्वजनिक गोष्टींसपासून लांब होते. पण आता त्यांनी सह-ट्रस्टी विजय सिंग यांच्या प्रश्नांना उत्तर देताना ही मोठी कमेंट केली आहे. त्यांचा तर्क आहे की, टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचा ट्रस्टमध्ये समावेश झाल्यापासून, ‘टाटा सन्स’शी संबंधित निर्णय घेण्याचे अधिकार एकाच ठिकाणी केंद्रित झाले आहेत.
‘आर्टिकल्स ऑफ असोसिएशन’मध्ये केलेल्या बदलाबद्दलही केले प्रश्न उपस्थित
याशिवाय जिमी टाटा यांनी 2013-14 च्या काळात टाटा सन्स च्या ‘आर्टिकल्स ऑफ असोसिएशन’मध्ये केलेल्या सुधारणांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, या बदलांमुळे ‘टाटा ट्रस्ट्स’ची परोपकारी उद्दिष्टे आणि ‘टाटा सन्स’चे व्यावसायिक कामकाज यांच्यातील स्पष्ट फरक पुसट झाला आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी काही विश्वस्तांच्या कार्यकाळाच्या मर्यादेबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे होते की, यामुळे त्यांची स्वायत्तता धोक्यात येऊ शकते आणि जे लोक असहमती दर्शवू इच्छितात, त्यांचे आवाज कदाचित दाबले जाऊ शकतात.
हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, नोएल टाटा हे रतन टाटांचे सावत्र भाऊ आहेत. तर जिमी टाटा हे त्यांचे सख्खे धाकटे भाऊ आहेत. त्यांचे वडील नवल टाटा होते. रतन टाटा आणि त्यांचे धाकटे भाऊ जिमी टाटा हे नवल टाटा आणि त्यांच्या पहिल्या पत्नी, सुनी कमिसारिएट यांचे सुपुत्र होते. तर नोएल टाटा हे नवल टाटा आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी, सिमोन टाटा यांचे सुपुत्र आहेत. ऑक्टोबर २०२४ मध्ये रतन टाटांच्या निधनानंतर, नोएल टाटा यांची ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली. ‘टाटा ट्रस्ट्स’ ही टाटा समूहाच्या कामकाजावर देखरेख ठेवणारी मुख्य संस्था आहे.