होम लोन, कार लोनचा EMI झटक्यात कमी होणार? RBI लवकरच…मोठी खुशखबर मिळण्याची शक्यता!

गेल्या काही दिवसांपासून रेपो रेट कमी होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. असे असतानाच आता वेगवगळे अर्थतज्ज्ञ रेपो रेटबाबत आपापले मत व्यक्त करत आहेत.

होम लोन, कार लोनचा EMI झटक्यात कमी होणार? RBI लवकरच...मोठी खुशखबर मिळण्याची शक्यता!
reportee and home loan emi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 30, 2025 | 7:29 PM

Repo Rate News : देशात सध्या महागाई वाढण्याची भीती कमी झाली आहे. त्यामुळे लवकरच भारतीय रिझर्व्ह बँक आगामी पतधोरण समितीच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. याच बैठकीत रेपो रेटसंदर्भात मोठा निर्णय होऊ शकतो. काही तज्ज्ञांच्या मतानुसार या बैठकीत रेपो रेट 0.25 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. हा अंदाज खरा ठरला तर सामान्यांना त्याचा चांगलाच फायदा होण्याची शक्यता आहे. कारण रेपो रेट 0.25 टक्क्यांनी कमी झाल्यास सामान्यांचा घराचा, वाहन कर्जाचा तसेच पर्सनल लोनचा ईएमआय कमी होऊ शकतो.

5 डिसेंबर रोजी होणार घोषणा

गेल्या दोन महिन्यांत किरकोळ माहागाईदेखील सरकारच्या 2 टक्क्यांच्या लक्ष्यापेक्षा कमी आहे. त्यामुळेही काही तज्ज्ञ रेपो रेट कमी होऊ शकतो, असे काहीजण म्हणत आहेत. तर काही तज्ज्ञांकडून अर्थव्यवस्थेत सध्या तेजी आलेली आहे. त्यामुळे आरबीआय रेपो रेट कमी करणार नाही, असेही सांगितले जात आहे. येत्या 3 ते 5 डिसेंबर 2025 या काळात पतधोरण समितीची बैठक होणार आहे. या बैठकीची सांगता झाल्यानंतर 5 डिसेंबर रोजी आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची घोषणा करतील. याच वेळी आरबीआयने रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे की नाही हे समजेल.

रेपो रेट खरंच कमी होणार का?

आरबीआयने गेल्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापासून रेपो रेटमध्ये कपात करण्यास सुरुवात केली होती. सध्या महागाई कमी झाली आहे. त्यामुळेदेखील आरबीआय रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी कपात करू शकते, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. एचडीएफसी बँकेच्या एका रिपोर्टनुसार देशाची आर्थिक वाढ अपेक्षेपेक्षा जास्त आणि चलनवाढ ही अपेक्षेपेक्षा कमी आहे. त्यामुळे पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो रेट 0.25 टक्क्यांनी कमी केला जाऊ शकतो. तर भारतीय स्टेट बँकेच्या आर्थिक संशोधन विभागाच्या रिपोर्टनुसार जीडीपी वाढ आणि अतिशय कमी चलनवाढ यामुळेही आरबीआयला रेपो रेटसंदर्भात ठोस निर्णय घ्यावा लागेल.

बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस यांच्या मतानुसार आरबीआय रेपो रेटमध्ये कपात करणार नाही. तर क्रिसिलचे मुख्य अर्थतज्ज्ञ धर्मकीर्ति जोशी यांनी डिसेंबर महिन्यात 0.25 टक्क्यांनी रेपोरेट घटू शकतो, असे भाकित व्यक्त केले आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.