गणेशोत्सव तोंडावर, रत्नागिरीत एका घरात तब्बल 18 जिवंत गावठी बॉम्ब, आरोपीचा नेमका कट काय?

| Updated on: Sep 02, 2021 | 5:59 PM

आपण जम्मू-काश्मीर किंवा दिल्लीत बॉम्ब आढळल्याच्या घटना ऐकल्या आहेत. या अशा घटना खेड्यापाड्यात किंवा महाराष्ट्रातील ग्रामीण भागात घडतील असं कधीही मनात येणार नाही. पण बऱ्याचदा जे अनपेक्षित असतं तेच घडून जातं.

गणेशोत्सव तोंडावर, रत्नागिरीत एका घरात तब्बल 18 जिवंत गावठी बॉम्ब, आरोपीचा नेमका कट काय?
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

रत्नागिरी : आपण जम्मू-काश्मीर किंवा दिल्लीत बॉम्ब आढळल्याच्या घटना ऐकल्या आहेत. या अशा घटना खेड्यापाड्यात किंवा महाराष्ट्रातील ग्रामीण भागात घडतील असं कधीही मनात येणार नाही. पण बऱ्याचदा जे अनपेक्षित असतं तेच घडून जातं. तसंच काहीसं रत्नागिरीत घडलं आहे. विशेष म्हणजे त्यापेक्षा आणखी काहीतरी भयानक अनपेक्षित घटना घडण्याआधी पोलिसांनी केलेली कारवाई ही मौल्यवान ठरली. या मोहिमेत दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोध आणि नाशक पथकाची देखील भूमिका महत्त्वाची ठरली.

नेमकं प्रकरण काय?

रत्नागिरीच्या देवरुख नजीकच्या हरपुडे येथील एका इसमाच्या घरात तब्बल 18 जिवंत गावठी बॉम्ब सापडले आहेत. संबंधित घटना ही बुधवारी (1 सप्टेंबर) रात्री उशिरा उघडकीस आली. पोलिसांनी याप्रकरणी 48 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीचं नाव सुरेश आत्माराम किर्वे असं आहे. तो हरपुढे येथील मराठवाडी वस्तीत राहतो. त्याच्या घरात बॉम्ब सापडल्याची माहिती उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी नेमकी कारवाई कशी केली?

आरोपी सुरेश किर्वे याच्या घरात जिवंत गावठी बॉम्ब असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर पोलीस, दहशतवाद विरोधी पथर आणि बॉम्ब शोध व नाशक पथक कामाला लागलं. सुरक्षा यंत्रणांनी आधी सापळा रचला. त्यानंतर सविस्तर माहिती घेत पोलिसांसह इतर पथकांनी संयुक्तपणे कारवाई केली. ते बुधवारी हरपुढे येथे दाखल झाले. त्यानंतर त्यांनी योग्य संधी मिळताच आरोपी सुरेश किर्वे याच्या घरात छापा टाकला. यावेळी घरात सापडलेला शस्त्रसाठा बघून पोलीसही चक्रावले.

बॉम्बची किंमत तब्बल 9 हजार

आरोपीच्या घरात तब्बल 18 जिवंत गावठी बॉम्ब आढळले. या सर्वांची किंमत प्रत्येकी 9 हजार रुपये इतकी होती. पोलीस आणि इतर पथकांनी आरोपीला ताब्यात घेतलं. जिवंत गावठी बॉम्ब बेकायदेशीरपणे आपल्या ताब्यात ठेवून मानवी जीवितास तसेच प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण केला म्हणून पोलिसांनी आरोपी सुरेश किर्वे याच्याविरोधात देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचं धाडसत्र सुरु

या प्रकरणाचा अधिक तपास देवरुखचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील करीत आहेत. दरम्यान, हरपुडे येथील सुरेश किर्वे या तरूणाच्या घरात 18 जिवंत गावठी बॉम्ब सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. सुरेशने हे गावठी बॉम्ब नेमके कशासाठी घरात ठेवले होते? याचा तपास पोलीस करत आहेत. दुसरीकडे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. अनधिकृत धंद्यांवर पोलीसांचे धाडसत्र सुरु झाले आहे.

हेही वाचा :

तरुणी आंघोळ करताना व्हिडीओ शूट, धमकावून अपहरण करत अत्याचार, नागपुरातील प्रकार

तो मध्यप्रदेशातून नागपुरात यायचा, काही दिवस मुक्काम ठोकायचा, नंतर संधी साधून जे करायचा ते ऐकून पोलीसही चक्रावले