बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवत ग्राहकाला लुटले, बँकेतच घडलेल्या प्रकाराने खळबळ

| Updated on: Jun 08, 2023 | 2:38 PM

पुण्यात बँकेत पैसे भरण्यासाठी एक ग्राहक आला होता. पैसे भरण्याची स्लिप भरत असतानाच ग्राहकासोबत जे घडलं ते पाहून सर्वांना धक्का बसला.

बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवत ग्राहकाला लुटले, बँकेतच घडलेल्या प्रकाराने खळबळ
पुण्यात बँकेतच ग्राहकाला चुना
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे : पुण्यातील खाजगी बँकेत अजब चोरीचा प्रकार घडला आहे. भरदिवसा बँकेतून एका ग्राहकाचे लाखो रुपये लुटल्याची घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली. फिर्यादीला रियल इस्टेटच्या व्यवसायात कमिशनमध्ये मिळालेले 2 लाख रुपये चोरांनी लुटले. कोंढवा येथील बँकेच्या शाखेत काल सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवत पैसे लंपास केले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. अक्षय गोटे असे फिर्यादी तरुणाचे नाव असून, तो रिअल इस्टेटचा व्यवसाय करतो. याप्रकरणी अक्षय गोटे याने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अक्षयच्या फिर्यादीवरुन कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कमिशनचे पैसे भरण्यासाठी बँकेत गेला होता

अक्षय हा महमदवाडी परिसरात राहत असून, बुधवारी सकाळी जागेच्या व्यवहारातून मिळालेले कमिशनचे 2 लाख रुपये इंडसइन्ड बँकेत भरण्यासाठी आला होता. 2 लाख रुपयांची रक्कम पत्नी कविता गोटे हिच्या अकाऊंटवर भरण्यासाठी तो बँकेतील स्लिप भरत असताना त्याच्याजवळ एक अनोळखी व्यक्ती आला. आरोपीने फिर्यादीला बँकेतील कर्मचारी असल्याचे भासवले. आम्हाला एटीएममध्ये पैसे भरायचे आहेत. तुमची स्लिप लवकर भरा असे सांगितले.

फिर्यादीला बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून लुटले

यानंतर तो माणूस काऊंटरवर तेथील मॅडमशी बोलू लागला. त्यानंतर पुन्हा तो माणूस अक्षयजवळ आला आणि त्याने मला पैसे द्या, असे सांगितले. तेव्हा हा चोर बँकेतील कर्मचारी असल्याचे तक्रारदाराला वाटले. तक्रारदाराने चोराला पैसे दिले आणि तो स्लीप भरू लागला. स्लीप भरल्यावर जेव्हा तो कॅश काऊंटरवर गेला तेव्हा त्याला तो माणूस दिसला नाही. चोर ती रक्कम घेऊन लंपास झाला होता.

हे सुद्धा वाचा

याबाबत फिर्यादीने बँकेत चौकशी केली असता तो बँकेतील कर्मचारी नसल्याचे निष्पन्न झाले. यावेळी फिर्यादी याने तात्काळ पोलीस स्टेशन येथे भेट देत तक्रार दाखल केली. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.