
इंदूर स्थित व्यावसायिक राजा रघुवंशीच्या पिंडदानाचा विधी शुक्रवारी उज्जैनमध्ये पार पडला. यावेळी कुटुंबीय आणि सोनमचा भाऊ तिथे उपस्थित होता. राजा रघुवंशीच सोनमसोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर महिन्याभराच्या आत मेघालयमध्ये हनिमूनवर असताना सोनमने राजाला संपवलं. यासाठी तिने तिचा प्रियकर राज कुशवाह आणि अन्य तिघांची मदत घेतली. हनिमूनला गेलेलं हे कपल अचानक बेपत्ता झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. उज्जैनमध्ये क्षिप्रा नदीच्या किनाऱ्यावर सचिन आणि विपिन यांनी राजा रघुवंशीच्या पिंडदानाचा विधी केला. हे दोघे राजाचे सख्खे भाऊ आहेत.
यावेळी तिथे सोनमचा भाऊ गोविंद उपस्थित होता. तो म्हणाला की, “लग्नाआधीपासून माझी बहिण सोनम आणि राज कुशवाहमध्ये प्रेम प्रकरण सुरु असल्याची मला कल्पना नव्हती. मला माहित असतं, तर मी त्यांचं लग्न लावून दिलं असतं किवा राज कुशवाहसोबत पळून जायला मदत केली असती” लाइव्ह हिंदुस्तानशी बोलताना गोविंद हे म्हणाला. राजा कुशवाह आणि सोनमच 11 मे रोजी लग्न झालं. लग्नानंतर दहा दिवसांनी ते हनिमूनसाठी शिलॉन्ग येथे गेले. तिथे राजाची हत्या करण्यात आली. मेघालय पोलिसांनी या प्रकरणात सोनम, तिचा प्रियकर राज आणि त्यांच्या अन्य साथीदारांना अटक केली आहे.
‘तिने जे केलं, त्याला माफी नाही’
‘मी अजूनही यांना आपलं मानतो म्हणून मी इथे आहे’, असं गोविंद म्हणाला. “पिंडदानाचा विधी करण्यासाठी मी राजाच्या कुटुंबासोबत आलो. हे मला माझ्या भावाच्या कुटुंबासारखं आहे” असं गोविंद म्हणाला. सोनमबद्दल बोलताना गोविंद म्हणाला की, ‘ती दोषी असेल, तर तिला फासावर लटकवा’ सोनम हट्टी आणि संतापी स्वभावाची असल्याच गोविंदने सांगितलं. “आमच्याबाजूने तिच्यावर कुठलाही दबाव नव्हता. तिला लग्न करायचं नव्हतं, तर तस तिने सांगायला हवं होतं. तिने जे केलं, त्याला माफी नाही. तिने फक्त इंदूरला लाज आणली नाही, संपूर्ण मध्य प्रदेशच नाव खराब केलं” असं गोविंद म्हणाला.