धनंजय देशमुख परळीतील ‘त्या’ तरुणाच्या भेटीला, मारहाण झाल्यानंतर केली मोठी मागणी!

परळीमध्ये दहा ते बारा जणांच्या एका टोळक्याने शिवराज दिवटे नावाच्या एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. लाठ्या-काठ्याने ही मारहाण झाली आहे.

धनंजय देशमुख परळीतील त्या तरुणाच्या भेटीला, मारहाण झाल्यानंतर केली मोठी मागणी!
parli crime news
| Updated on: May 17, 2025 | 6:50 PM

Parli Crime News : परळीमध्ये दहा ते बारा जणांच्या एका टोळक्याने शिवराज दिवटे नावाच्या एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. लाठ्या-काठ्याने ही मारहाण झाली आहे. विशेष म्हणजे या अमानुष मारहाणीचा एक व्हिडीओही सध्या व्हायरल झाल्याने या प्रकरणाची राज्यभरात चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, असा दावा केला जात होता. असे असतानाच आता मारहाणीचे हे प्रकरण समोर आले आहे. दरम्यान, आता मारहाणीत जखमी झालेल्या शिवराज दिवटे या तरुणाच्या भेटीला धनंजय देशमुख गेले आहे. त्यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली असून लवकरच बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

कठोर शासन करणे गरजेचे

धनंजय देशमुख हे बीडचे दिवगंत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू आहेत. संतोष देशमुख यांची काही महिन्यांपूर्वी निर्घृण हत्या झाली होती. या हत्येनंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. “मी उद्या किंवा परवा दिवशी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेणार आहे. परळी तालुक्यातील लिंबुटा गावातील युवक शिवराज दिवटे यास दहा ते बारा युवकांनी परळी तालुक्यातील टोकवाडी शिवारात घेऊन मारहाण करण्यात आली होती. त्याचा व्हिडिओदेखील व्हायरल करण्यात आला होता. या घटनांना पायबंद घालायचा असेल तर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या या लोकांची जुनी पार्श्वभूमी काढणे गरजेचे आहे. यांना कठोरातील कठोर शासन करणे गरजेचे आहे. मारहाण करणारे सर्व 18 ते 20 25 वर्षाचे युवक आहेत,” अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.

तसेच, घडलेली घटना अत्यंत चुकीची आहे. यांना एक गुन्हा झाल्यानंतर दुसरा गुन्हा करण्याची शिकवण दिली जात आहे. भूतकाळात जशा घटना घडल्या त्यांची पुनरावृत्ती करण्याचा हा प्रयत्न आहे. मी उद्या किंवा परवा बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेणार आहे. बाकीच्या लोकांना तत्काळ ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असेही धनंजय देशमुख म्हणाले.

मी दूरध्वनीवरून डीवायएसपीसी यांच्याशी संपर्क साधला

शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांनीदेखील जखमी तरुणाची भेट घेतली आहे. बीडमधील कायदा व सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न झाला आहे. मी दूरध्वनीवरून डीवायएसपीसी यांच्याशी संपर्क साधला आहे. पीडित तरुणाच्या कुटुंबावर दबाव टाकण्यात येत आहे. एफआयआरमध्ये जी नावे आहेत त्या नावांमध्ये कसल्याही प्रकारचा बदल होता कामा नये. उलट यामध्ये आरोपीची संख्या वाढायला हवी, अशी भूमिका ज्योती मेटे यांनी घेतली.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार 16 मे 2025 रोजी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये दहा ते बारा जणांच्या टोळक्याकडून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात येत होती. एका कार्यक्रमात झालेल्या वादाचा राग मनात धरून ही मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे मारहाण करण्यासाठी या तरुणाचे अपहरण करण्यात आले होते. या मारहाणीत तरुण जखमी झालाय. सध्या या तरुणावर उपचार चालू आहेत.