
दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात सोमवारी संध्याकाळी शक्तीशाली कार बॉम्बस्फोट झाला. या बॉम्ब स्फोटाने अख्ख्या देशाला हादरवून सोडलय. बॉम्बस्फोट घडवण्याचा एक नवीन पॅटर्न समोर आलाय. हल्लेखोरांनी यावेळी एक वेगळ्या पद्धतीच प्लानिंग केलं होतं. तपास यंत्रणांना चक्रावून सोडणं हा त्यामागे उद्देश होता. स्फोट घडवण्याच्या पद्धतीपासून ते कारच्या मालकी पर्यंतचा एक वेगळा पॅटर्न आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचेच संकेत मिळत आहेत. i20 कारमध्ये स्फोट झाल्यानंतर तिथे खड्डे पडले नाहीत, बॉम्बस्फोटानंतर उडणारे तीक्ष्ण, टोकदार तुकडे आढळले नाहीत. फॉरेन्सिक एक्सपर्ट, दहशतवाद विरोधी एक्सपर्ट्सनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला.
स्फोटकांमध्ये वापरलेल्या उच्च ज्वलनशील रसायनामुळे जास्त जिवीतहानी झाल्याची शक्यता आहे. ही उच्च क्षमतेची स्फोटकं होती असा सूत्रांनी सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. स्फोटक बनवताना त्यात अमोनियम नायट्रेट आणि RDX चा वापर झाल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. स्फोटाच्या सखोल विश्लेषणानंतरच बॉम्बस्फोट घडवण्याची थिअरी समोर येईल. फरीदाबादमधूनही काही गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्याशी दिल्ली स्फोटाचा काही संबंध आहे का? हे सुद्धा तपासलं जातय.
पुलवामा कनेक्शन
या बॉम्बस्फोटाचा सर्व अंगांनी तपास होईल. राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA हा तपास आपल्या हाती घेऊ शकते. दिल्ली पोलिसांनी रात्री उशिरा या प्रकरणी FIR नोंदवला आहे. स्फोटासाठी वापरलेल्या’HR 26 7674′ i20 कारची मालकी गुरुगावमध्ये राहणाऱ्या सलमानकडे आढळून आली. मार्च महिन्यात देवेंद्र नावाच्या माणसाला कार विकल्याच त्याने सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी अधिक माहिती काढण्यासाठी आरटीओशी संपर्क साधला. प्राथमिक तपासातून ही माहिती समोर आली आहे. बनावट आयडी वापरण्यात आलं असून एक रहिवाशी पुलवामाचा आहे. या कारची मालकी वेगवेगळ्या मालकांकडे आढळल्याने भुवया उंचावल्या आहेत.
सीसीटीव्ही फुटेज समोर
दिल्ली बॉम्बस्फोटाच्या तपासात महत्वाचं ठरणारं सीसीटीव्ही फुटेज समोर आलय. एक सफेद रंगाची i20 कार लाल किल्ला भागातून जाताना दिसतेय. कारच्या सीटवर बसलेली व्यक्ती सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. कार चालवणाऱ्याने तोंडाला काळ्या रंगाचं मास्क लावलेलं होतं.