ईडीसमोर नेमकं कधी हजर होणार? अनिल देशमुखांचं पहिल्यांदाच थेट उत्तर

| Updated on: Aug 19, 2021 | 5:42 PM

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने पाच वेळा समन्स बजावले आहेत. मात्र, पाच वेळा समन्स बजावूनही ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत.

ईडीसमोर नेमकं कधी हजर होणार? अनिल देशमुखांचं पहिल्यांदाच थेट उत्तर
अनिल देशमुख, नेते, राष्ट्रवादी
Follow us on

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने पाच वेळा समन्स बजावले आहेत. मात्र, पाच वेळा समन्स बजावूनही ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे ईडी आता अनिल देशमुख यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीने याबाबतची कारवाई करण्याआधीच अनिल देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अनिल देशमुख प्रसिद्धीपत्रकात नेमकं काय म्हणाले?

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. “मी कायद्याचं पालन करतो. मी जेव्हा हवं तेव्हा ईडीला सामोरे जाईन. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मी पुढे जाईल. माझी याचिका कोर्टाने दाखल करुन घेतली आहे”, असं देशमुख म्हणाले आहेत.

ईडीचे आतापर्यंत पाच समन्स

अनिल देशमुख यांना ईडीने आतापर्यंत 5 समन्स बजावले आहेत. त्यात पहिलं समन्स 25 जून रोजी देऊन 26 जून रोजी हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं होतं. दुसरं समन्स तात्काळ 26 जून रोजी देऊन आठवड्याभरात म्हणजे 3 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. तिसरं समन्स बजावल्यानंतर 5 जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. तर चौथं समन्स 30 जुलै रोजी पाठवून 2 ऑगस्ट रोजी हजर राहण्याबाबत सांगण्यात आलं होतं. त्यानंतर कालचं (18 ऑगस्ट) हे पाचव समन्स होत.16 ऑगस्ट रोजी समन्स पाठवून त्यांना 18 ऑगस्टला हजर राहण्यासाठी सांगितलं गेलं होतं. मात्र, देशमुख कालही चौकशीसाठी गेले नाहीत. त्यांनी त्यांचे वकील इंदरपाल सिंग यांना निवेदन घेऊन पाठवलं होतं.

अनिल देशमुखांचं निवेदन काय?

दरम्यान, सुप्रीम कोर्टात आमची याचिका दाखल झाली आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणात सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल आहेत. त्याच्याशी आमची याचिका जोडली गेली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट जो निकाल देईल तो आम्हाला मान्य असेल. पण जोपर्यंत आमचं प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे, तोपर्यंत आम्हाला समन्स पाठवलं जाऊ नये. आम्हाला सवलत द्यावी. आमच्यासाठी अनेक कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. हा गुन्हा रद्द करण्यासाठी कोर्टातही जाऊ शकतो. त्यामुळे आम्हाला समन्स पाठवलं जाऊ नये, असं अनिल देशमुख यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

ऑनलाईन चौकशीची देशमुखांची मागणी

अनिल देशमुख यांना पहिलं समन्स 25 जून रोजी पाठवण्यात आलं होतं. त्याला अनिल देशमुख यांनी उत्तर दिलं होतं. आपल्या विरोधात दाखल गुन्ह्याची आपल्याला प्रत देण्यात यावी. आपल्या विरोधात काय पुरावे आहे त्याची माहिती देण्यात यावी, असं अनिल देशमुख यांचं सुरुवातीला म्हणणं होतं. त्याचबरोबर त्यात त्यांनी आपण 72 वर्षाचे आहोत. आपल्याला अनेक आजार आहेत. सध्या कोविडचा काळ आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आपली ऑनलाईन चौकशी करावी, असंही देशमुख यांचं म्हणणं होतं. आता पुन्हा आपण ऑनलाईन चौकशीला तयार असल्याचं देशमुख यांचं म्हणणं आहे. मात्र, ईडीचे अधिकारी त्यांना ही सवलत देतात का, हे पहावं लागणार आहे.

संबंधित बातम्या :

ठाकरे सरकार आणि अनिल देशमुखांना दणका, याचिका फेटाळल्या; सीबीआय चौकशी योग्य असल्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा

Anil Deshmukh: सीबीआयची चौकशी टाळण्यासाठी अनिल देशमुख दिल्लीत; ‘या’ बड्या वकिलाची भेट