Dahisar Crime : बँकेतही पैसे सुरक्षित नाहीत? बोगस सही करुन पैसे लुटणारी टोळी गजाआड! टोळीत बँकेचा कर्मचारीही

| Updated on: May 02, 2022 | 8:32 AM

Bank Fraud : महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या टोळीमध्ये अनेकजण सामील असल्याचं निष्पन्न झाले.

Dahisar Crime : बँकेतही पैसे सुरक्षित नाहीत? बोगस सही करुन पैसे लुटणारी टोळी गजाआड! टोळीत बँकेचा कर्मचारीही
बँकेतही पैसे सुरक्षित नाही
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : बँकेत बोगस सही (Fake Signature) करुन लाखो रुपये उकळणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. दहिसर पोलिसांनी (Dahiasar Police) चौघांना याप्रकरणी अटक केली. अटक करण्यात आलेल्या चौघांमध्ये एका बँक कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. हा बँक कर्मचारी सहज बोगस सही करता येईल, अशी खाती शोधून देत असल्याचा आरोप करण्यात आलाय. खातं मिळाल्यानंतर एनईएफटीद्वारे बनावट खात्यात पैसे ट्रान्सफर (Money Transfer) केले जात होते. एका महिलेच्या खात्यातून तब्बल 18 लाख रुपये काढून घेण्यात आले होते. बँकेत जेव्हा पैसे काढण्यासाठी ही महिला पोहोचली, तेव्हा तिला धक्काच बसला. आपल्या खात्यातून कुणीतरी परस्पर पैसे काढल्यानं महिलेच्या लक्षात आल्यानंतर याप्रकरणी महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या पोलीसांच्या तपासातून खळबळजनक खुलासे करण्यात आले. तसंच चार जणांना याप्रकरणी पोलिसांनी बेड्याही ठोकल्यात.

अशी केली चोरी…

ग्रेटर बॉम्बे को ऑपरेटीव्ह बँकेत बनावट सही करून एनईएफटीच्या माध्यमातून फसवणूक केली जात होती. ही फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश दहिसर पोलिसांनी कालय. या टोळीनं दहिसर पूर्वेला राहणाऱ्या रेणू यादव नावाच्या महिलेचा आपली शिकार बनवलं. रेणू यादव यांच्या खात्यातून सुमारे 18 लाख रुपये एनईएफटीद्वारे ट्रान्सफर करून अनेक बनावट खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. त्याआधी एका बँक कर्मचाऱ्यानंच रेणू यादव या महिलेचं खात शोधून काढलं होतं. त्यानंतर या बँक अकाऊंटला निशाणा बनवण्यात आलं.

ही महिला बँकेतील खात्यातून पैसे काढण्यासाठी गेली असता, तिच्या खात्यातून कोणीतरी पैसे ट्रान्सफर केल्याचं महिलेच्या लक्षात आलं. त्यानंतर महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या टोळीमध्ये अनेकजण सामील असल्याचं निष्पन्न झाले. अखेर पोलिसांनी सापळा रचून ग्रेटर बँक घाटकोपर शाखेतील कर्मचारी सुरेश शनमराव पवार याला अटक केली.

टोळीचा पर्दाफाश

बँकेतील कर्मचारी सुरेश पवारला अटक केल्यानंतर पोलिसांची त्याची कसून चौकशी सुरु केली. यानंतर चौकशीअंती पोलिसांनी अख्तर मुस्ताक कुरेशी, एजाज शमशुद्दीन खान आणि साकीर मोहम्मद उमर सलमानी यांना दहिसर येथून अटक करण्यात आली. आरोपी एजाज शमशुद्दीन खान हा आरोपी असून तो दहिसर येथून पसार झाला होता. पोलिसांनी आरोपींना अटक करून तपास केला असता सर्व बनावट खात्यांवर पैसे ट्रान्सफर झाल्याचं आढळून आलंय. या टोळीत आणखी अनेक जण सामील असून त्यांना अटक करायची आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक विकास लोकरे यांनी दिली आहे.